राहुल गांधींचे पंतप्रधानांना आव्हान; 'हिंमत असेल तर एकदा विद्यार्थ्यांशी बोला'

Gandhi-Modi
Gandhi-Modi

नवी दिल्ली : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोणत्याही विद्यापीठात जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी बेरोजगारी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेविषयी बोलावे,'' असे थेट आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. देशातील तरुणाईला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा कायदेशीर हक्क आहे आणि त्यांचे म्हणणे तुम्हाला ऐकावेच लागेल, असेही गांधी पुढे म्हणाले. 

देशातील प्रमुख वीस विरोधी पक्षनेत्यांची बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर राहुल गांधी माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ''पंतप्रधान मोदींनी देशातील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटून देशाची अर्थव्यवस्था का अडचणीत आली याविषयी बोलले पाहिजे. मात्र, त्यांच्यात एवढी हिंमत नाही. कारण तरुणांशी बोलायला धाडस लागते.'' मी देशासाठी काय करणार आहे? हे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगावे, असे चॅलेंजही त्यांनी मोदींना दिले. 

तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष्य देण्याऐवजी त्यांचे लक्ष्य दुसरीकडे वळविण्यात आणि फूट पाडण्याचे धोरण सध्या देशात राबविले जात असल्याबाबत गांधी यांनी खेद व्यक्त केला. 

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. देशातील सर्व स्तरातील नागरिक आणि तरुणांनी देशव्यापी आंदोलने केली. सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा सरकारने आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आंदोलनाचे मूळ वेगळे असताना कारवाईचा बडगा उगारण्याकडे सरकारचे लक्ष्य होते, असे सोनिया यांनी म्हटले आहे. 

सोनिया पुढे म्हणाल्या, ''जामिया मिलिया, अलाहाबाद विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या देशातील महत्त्वाच्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांवर भाजप समर्थकांनी प्राणघातक हल्ला केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.'' 

दरम्यान, गेल्या महिन्यात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात निदर्शने केल्यानंतर देशभरात हिंसाचाराच्या घटनांना वेग आला. त्यानंतर गेल्या आठवड्यात दिल्लीत जेएनयू या प्रमुख विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांवर काही गुंडांनी सशस्त्र हल्ला केल्याने देशभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. 

सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत विद्यार्थ्यांची निदर्शने, देशभरात सुरू असलेली आंदोलने, नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, याकडे सहा प्रमुख विरोधी पक्षांनी पाठ फिरवली. त्यामध्ये तृणमूल काँग्रेस, बसपा, शिवसेना, डीएमके आणि समाजवादी पक्षाचा समावेश आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com