लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश

टीम ई सकाळ
Tuesday, 2 February 2021

राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटलं की, लाल किल्ला अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांसाठी बंद केला जात आहे. 

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्मारक असलेला लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटलं की, लाल किल्ला अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांसाठी बंद केला जात आहे. 

राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाच्या आदेशाचं पत्र समोर आलं आहे. या आदेशाला आर्कियालॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संचालकांनी मंजुरी दिली आहे. तसंच आदेशावर डायरेक्टर मॉन्युमेंट 2, अरविन मंजुल यांची सही आहे. बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे लाल किल्ला बंद करण्याचे आदेश दिल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

हे वाचा - हवाई युद्धात भारताचं पारडं झालं भारी; जाणून घ्या Warrior Drone ची वैशिष्ट्ये

आपत्ती व्यवस्थापन समितीकडून मिळालेल्या आदेशानुसार, लाल किल्ला पुढचे आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. हा निर्णय लाल किल्ल्याच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. या भागात बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला बंद करण्यात येत आहे.

दिल्लीत बर्ड फ्लूचा ससंर्ग सुरूच आहे. जानेवारी महिन्यात दोन आठवड्यांच्या आतच 1200 पेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हा असं म्हटलं जात होतं की, सर्व पक्षी बर्ड फ्लूमुळेच मृत झालेले नाही. मात्र तरीही बर्ड फ्लूचा ससंर्ग राज्यात आहे. अनेक ठिकाणी तपासणीच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. 

हे वाचा - शेतकरी आंदोलनाच्या ज्वाळा कायम; 'बहुत लंबा चलेगा रे दंगल हमारा'

याआधीसुद्धा लाल किल्ला बर्ड़ फ्लूमुळे काही दिवस बंद करण्यात आला होता. जानेवारी महिन्यात लाल किल्ल्यावर मृत कावळे आढळले होते. त्यात बर्ड फ्लूचा ससंर्ग असल्याचं समोर आल्यानंतर परिसर 21 ते 26 जानेवारी या कालावधीत पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. 10 जानेवारीलासुद्धा लाल किल्ल्याच्या परिसरात 15 मृत कावळे आढळले होते. सध्या हा परिसर बर्ड फ्लू संक्रमित असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: red fort closed indefinitely order issued due to bird flu

Tags
टॉपिकस
Topic Tags: