esakal | संघर्षातून फुलली ‘आशा’; महिला सफाई कामगाराचे प्रशासकीय परीक्षेत यश
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्षातून फुलली ‘आशा’; महिला सफाई कामगाराचे प्रशासकीय परीक्षेत यश

संघर्षातून फुलली ‘आशा’; महिला सफाई कामगाराचे प्रशासकीय परीक्षेत यश

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जोधपूर : महानगरपालिकेची सफाई कर्मचारी म्हणून रस्त्यांची झाडलोट करणाऱ्या महिलेला राजस्थानमधील सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसण्याचा मान मिळाला आहे. आशा कंडारा (वय ४०) हिने ही अशक्यप्राय गोष्ट साध्य केली आहे. आशाने २०१८ मधील राजस्थान प्रशासकीय सेवा (आरएएस) परीक्षा दिली होती. तीन वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता.१३) जाहीर झाला अन आशाने यात उज्ज्वल यश मिळवीत अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केले. आशाला दोन मुले असून ती पतीपासून वेगळी राहते. संसार मोडल्यानंतर मुलांचा एकटीने सांभाळ करताना अनेक अडचणी आल्या. जातीभेदापासून लिंगभेदापर्यंत सर्व सहन केले, पण त्याचे दुःख न करता मी हिमतीने लढायचे ठरविले, असे तिने सांगितले.

हेही वाचा: कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना १४०० इमेल्स

विभक्त झाल्यानंतर आशा वडिलांबरोब राहू लागली. तेही जोधपूर महानगरपालिकेत काम करत होते. आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन मुलांना मोठे करण्याचे स्वप्न बाळगताना आशाने आधी शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले. ती २०१६ मध्ये पदवीधर झाली. महापालिकेची सफाई कामगाराची परीक्षा ती २०१८ उत्तीर्ण झाली आणि ती शहरातील रस्ते झाडण्याचे काम करू लागली. हे काम करतानाच तिने ‘आरएएस’च्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. ऑगस्ट २०१८मध्ये प्राथमिक परीक्षेत यशस्वी झाल्याने अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी तिला बळ मिळाले. आता ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आशावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा: 'भेकड आणि संघ विचारसरणीच्या लोकांनी काँग्रेसपासून लांब रहावं'

जोधपूरच्या महापौरांनी तिचा सत्कार केला. या सत्कारावेळी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर बसायला मिळाले, याचा आशाला अभिमान वाटतो. ‘माझ्या संघर्षाचे चीज झाले, असे सांगत तिने यशाचे श्रेय तिला पालकांना आणि तिच्या निर्धाराला दिले. प्रशासकीय अधिकारी म्हणून समाजात न्याय आणण्यासाठी मला काम करायचे आहे. केवळ माझ्या समाजासाठी नव्हे तर अन्यायाला बळी पडलेल्या सर्वांना न्याय मिळावा, यासाठी मी काम करेन, असं आशा कंडारा यांनी म्हटलंय.

loading image