डमडम मध्यवर्ती सुधारगृहातील कैद्यांनी काय केले पहा

Eco-Friendly-bag
Eco-Friendly-bag

कोलकाता - संक्रांतीनिमित्त भरलेल्या गंगासागर मेळ्यात भाविकांना पर्यावरणपूरक बॅगांचे वितरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बॅगांची निर्मिती दीडशेहून अधिक कैद्यांनी दोन सुधारगृहांत केली आहे. दरवर्षी गंगासागर मेळ्यात दोन कोटींहून अधिक प्लॅस्टिक बॅगा जमा होतात, त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गंगासागर मेळा प्लॅस्टिक मुक्त करण्याचा निर्धार केला आणि त्यास कैद्यांचे बळ लाभले.

संक्रांतीनिमित्त गंगासागर येथे भरणाऱ्या मेळ्यात देशभरातून तीस लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. या भाविकांसाठी पर्यावरणपूरक अर्थात इकोफ्रेंडली बॅगचे वितरण केले जात असून, त्यासाठी ज्यूट आणि कापसापासून सुमारे ५० हजार बॅगची निर्मिती केली आहे. या बॅग डमडम मध्यवर्ती सुधारगृहात आणि प्रेसिडेन्सी सुधारगृहात तयार करण्यात आल्या. भाविकांना इकोफ्रेंडली बॅगचे वाटप केले जात आहे.

सुधारगृहातील कैद्यांनी अतिशय सुबकतेने इकोफ्रेंडली बॅग तयार केल्याचे प्रेसिडेन्सी सुधारगृहाच्या अधिकाऱ्याने सांगितले. स्वयंसेवी संस्था रक्षक फाउंडेशनमार्फत कैद्यांना बॅगनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन्ही सुधारगृहांचे प्रशासन आणि राष्ट्रीय ज्यूट बोर्डच्या मदतीने जैविक विघटित होणाऱ्या बॅगांची निर्मिती करण्यात आली आहे.

सुधारगृहांतील कैद्यांना प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची होणाऱ्या हानीची जाणीव करून देण्यात आली आणि इकोफ्रेंडली वस्तूंचे महत्त्व पटवून देण्यात आले. परिणामी इकोफ्रेंडलीच्या अभियानात योगदान दिल्याबद्दल कैद्यांनी समाधान व्यक्त केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या वर्षी गंगासागर बखाली डेव्हलपमेंट ॲथोरिटी (जीबीडीए) आणि दक्षिण चोवीस परगणा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण प्लॅस्टिकबंदी मोहिमेचा प्रभावीपणे अंमल करत यंदाचा गंगासागर मेळा हा ‘पर्यावरपूरक, हरित आणि स्वच्छ हवा’ करण्याचे ध्येय ठेवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com