पुढच्या 20 वर्षांपर्यंत कोरोनाचा धोका असेल; सीरम इन्स्टिट्यूटचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

जगातील सगळ्या लोकांना लस टोचली तरीही कोरोना व्हॅक्सिनची गरज संपणार नाही. व्हॅक्सिन हा काही उपचार नाही असंही आदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग आता मंदावला असला तरीही अद्याप धोका कमी झालेला नाही. जगभरात कोरोनावर व्हॅक्सिन कधी येणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. जगातील अनेक कंपन्या आणि संशोधन संस्था व्हॅक्सिनच्या निर्मितीसाठी दिवसरात्र झटत आहेत. याताच आता व्हॅक्सिनच्या निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या भारतातील सीरम इन्स्टिट्यूटने मोठा दावा केला आहे.

कोरोना व्हायरस लवकर संपणार नाही तर याचा धोका पुढच्या दोन दशकापर्यंत असेल. कंपनीचे सीईओ आदर पूनावाला यांनी एका बिझनेस वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, कोरोनाचा संसर्ग पुढचे 20 वर्षे राहिल आणि तोपर्यंत कोरोना व्हॅक्सिनची आवश्यकता भासेल.

हे वाचा - Positive Story:भारतात उपलब्ध होणार अर्धा डझन कोरोना लशी!

कोरोना व्हॅक्सिनच्या गरजेबाबत बिझनेस टूडेशी बोलताना आदर पूनावाला यांनी सांगितलं की, इतिहासात आतापर्यंत असं कधीच झालं नाही की व्हॅक्सिनची गरज एकदाच पडली आणि नंतर संपली. फ्लू, न्यूमोनिया, पोलिओ यांसारख्या आजारांची उदाहरणे देताना त्यांनी म्हटलं की, सर्व आजारांवर उपलब्ध असलेल्या व्हॅक्सिन अनेक वर्षे वापरल्या जात आहेत. यातील काही व्हॅक्सिन अद्याप बंद केलेल्या नाहीत. कोरोना व्हॅक्सिनही अशीच दीर्घकाळी वापरात राहील असं पूनावाला म्हणाले. 

जगातील सगळ्या लोकांना लस टोचली तरीही कोरोना व्हॅक्सिनची गरज संपणार नाही. व्हॅक्सिन हा काही उपाय नाही तर यामुळे फक्त प्रतिकारशक्ती वाढते. तुमच्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडी तयार करते. व्हॅक्सिन तुम्हाला आजारापासून वाचवतं पण 100 टक्के नाही. जरी सगळ्या लोकांना लस टोचली तरीही याची गरज भासेल असं आदर पूनावाला यांनी सांगितलं.

हे वाचा - Corona Update : सध्या भारतात 6,95,509 रुग्ण ऍक्टीव्ह; काल गुरुवारी 690 लोकांचा मृत्यू

सीरम इन्स्टिट्यूट ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राजेनेकाच्या संशोधनातून तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व्हॅक्सिनची निर्मिती करत आहे. सध्या हे व्हॅक्सिन ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात असून यात यश मिळेल अशी आशा संशोधकांना आहे. ही नॉन रिप्लिकेटिंग व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन आहे. अॅस्ट्राजेनेकाच्या करारानुसार भारतात सीरम या व्हॅक्सिनची निर्मिती करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serum institute claim corona-infection-will-continue next 20 years