कुटुंबातील सात जणांची हत्या करणाऱ्या शबनमची फाशी टळली

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 24 February 2021

अमरोहामधील बावनखेडी हत्याकांडाची दोषी शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली आहे

नवी दिल्ली- अमरोहामधील बावनखेडी हत्याकांडाची दोषी शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. अमरोहाच्या न्यायालयाने फिर्यादीला दोषी शबनमचा अहवाल मागीतला होता, पण अधिवक्त्याकडून राज्यपालांकडे दया याचिका दाखल करण्यात आली आहे. पुन्हा एकदा दया याचिका दाखल झाली असल्याने फाशीची तारीख निश्चित होऊ शकलेली नाही. मंगळवारी शबनमच्या फाशीवर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी फाशीची तारीख निश्चित होण्याची शक्यता होती, पण तसं झालं नाही. 

आता संसदेला घेरणार, 40 लाख ट्रॅक्टर दिल्लीत आणणार; राकेश टिकैत यांचा इशारा

सीबीआय चौकशीची मागणी

मागील आठवड्यात 12 वर्षाच्या मुलाला भेटून शबनम रडली होती. तसेच आपण निर्दोष असल्याचं म्हणत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. शबनमच्या मुलाचे पालन करणारे उस्मानी सैफी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. शबनमचा मुलाने शिक्षण घेतले असून तो एक चांगला व्यक्ती बनला आहे. 

शबनमचा काय होता गुन्हा?

अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने एप्रिल 2008 मध्ये आपल्या प्रियकराच्या सोबतीने आपल्या सात नातेवाईकांची कुऱ्हाडीने निर्दयीपणाने हत्या केली होती. अमरोहातील बावनखेडीमध्ये 2008 मध्ये ही खुनाची नृशंस घटना घडली होती. यावेळी शबनमने आपला प्रियकर सलीमसोबत आपले वडील मास्टर शौकत, आई हाशमी, भाऊ अनिस आणि राशिद यांच्यासह आणखी तिघा नातेवाईकांची  हत्या केली होती. हे सगळे त्यांच्या प्रेमाच्या आड येत होते. सध्या शबनम बरेली तर सलीम आगरा जेलमध्ये आहे. या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने शबनमची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. राष्ट्रपतींनी देखील तिच्या दयेचा अर्ज नाकारला होता. 

न्यायाधीश होणे व कायदेशीर सल्ला देण्याव्यतिरिक्त आहेत वकिलीनंतर अनेक पर्याय !...

आतापर्यंत एकाही महिलेला फाशी नाही

भारतातील महिलांना फाशी देण्याचं एकमेव ठिकाण मथुरेत आहे. मात्र याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. कारण अद्याप इथे कुणालाच फाशी दिली गेली नाहीये. याचं बांधकाम ब्रिटीश काळात 1870 मध्ये करण्यात आलं होतं. मथुरा जेलमध्ये 150 वर्षांपूर्वी महिला फाशीघर बनवलं गेलं होतं. मात्र, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत कोणत्याही महिलेला फाशीची शिक्षा दिली गेली नाहीये.  निर्भया प्रकरणातील आरोपींना फासावर लटकावणाऱ्या मेरठच्या पवन जल्लाद यांनी देखील दोनवेळा फाशीघराचं निरीक्षण केलं आहे. मात्र, अद्याप या फाशीची तारीख निश्चित झाली नाहीये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shabnam who killed seven members of his family get relief