क्रिकेटमध्येच नाही खऱ्या आयुष्यातही तो आहे 'दादा'; कोरोनाग्रस्तांसाठी पाहा काय करतोय!

वृत्तसंस्था
Thursday, 26 March 2020

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. देशात ५६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असलेला सौरव गांगुलीला सगळेजण दादा या टोपणनावाने संबोधतात. मात्र, त्याला दादा का म्हटलं जातं हे पुन्हा दिसून आलं आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात कोरोनाने थैमान घातल्याने केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. कोरोनाला आवर घालण्यासाठी सरकारी यंत्रणेनं फिल्डींग लावल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन राहिलेल्या गांगुलीनेही कोलकाता शहरात आपली कॅप्टनशिप सुरू केली आहे. त्याने कोलकाता शहरातील गरजू लोकांना मोफत तांदूळ वाटप करण्याचा इरादा पक्का केला आहे. यासाठी ५० लाख रुपये किंमतही दादाने मोजाले आहेत. पश्चिम बंगाल सरकारच्या शाळांमध्ये ज्या कोरोनाग्रस्तांना आयसोलेट करण्यात आलं आहे, त्या सर्वांसाठी गांगुली तांदूळ पुरवणार आहे. 

- कोरोनाची झळ ब्रिटनच्या राजघराण्यालाही; कोणाला झाली लागण?

गांगुलीने घेतलेल्या या पुढाकारानंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने २५ लाख आणि या असोसिएशनचे अध्यक्ष अविशेक दालमिया यांनी ५ लाख रुपये मदतनिधी राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी खुलं करणार ईडन गार्डन! 

राज्य सरकारला मदत व्हावी, यासाठी गांगुलीने देशातील क्रिकेट पंढरी समजले जाणारे ऐतिहासिक ईडन गार्डन हे स्टेडियम खुले करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. 

राज्य सरकारची परवानगी असेल तर ईडन गार्डन स्टेडियम कोरोनाग्रस्तांसाठी खुले करण्यात येईल. त्याठिकाणी तात्पुरते ओपन एअर हॉस्पिटल सुरू केले जाईल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जे करता येईल, ते करण्यासाठी तयार आहोत, असे मत गांगुलीने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केले. या संदर्भात आणखी मदतीसाठी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी चर्चा करण्याची तयारी गांगुलीने दर्शविली आहे. 

- कोरोनाचा स्फोट झालेल्या चीनमधील वुहानची आता काय स्थिती?

बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यापासून गांगुलीने क्रिकेट आणि लोकहितासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल डिस्टन्स, आयसोलेशन, क्वॉरंटाईन असे विविध पर्याय कोरोनाला रोखण्यासाठी वापरले जात आहेत. मात्र, हे प्रयत्न तोकडे पडत आहेत. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. देशात ५६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात ४,२२,८२९ जण कोरोनाच्या विळख्यात असून त्यापैकी १८,९०७ जण दगावले आहेत. असे असले तरी एक लाखाहून अधिकांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला आहे. 

- भूकंपाच्या धक्क्याने रशिया हादरले; त्सुनामीचा इशारा

तत्पूर्वी, भारताच्या शेजारील राष्ट्र असलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने सरकारला १ कोटी रुपयांचा मदतनिधी दिला आहे. जगप्रसिद्ध फुटबॉलपटू असलेला ओनेल मेस्सी आणि मँचेस्टर सिटीचे मॅनेजर पेप गॉर्डिओला यांनी १० लाख युरो म्हणजे ८ कोटी २० लाख रुपये मदतनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी उभारला आहे. दुसरीकडे स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोने कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी आपल्या हॉटेलमध्येच हॉस्पिटलची उभारणी केली आहे. आणि त्याचा सर्व खर्च तो स्वत: करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly to donate Rs 50 lakh worth rice to underprivileged amid Covid 19 lockdown