'तर बंगालचा 'काश्मीर' होईल'; ममतांविरोधात दंड थोपटणाऱ्या शुभेंदु अधिकारींचं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच गरमागरम आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींमुळे राज्यातील वातावरण चांगलेच गरमागरम आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटलंय की जर तृणमूल काँग्रेस राज्यात पुन्हा सत्तेवर आली तर पश्चिम बंगालचा 'काश्मीर' होईल. पश्चिम बंगालमधील बेहालामध्ये एका जनसभेला संबोधित करताना शुभेंदु अधिकारी यांनी म्हटलं की, जर श्यामा प्रसाद मुखर्जी नसते तर हा देश एक इस्लामिक देश बनला असता तसेच आपण बांग्लादेशाचे रहिवासी असतो. जर टीएमसी सत्तेत परत आली तर पश्चिम बंगालचा 'काश्मीर' होईल. 

हेही वाचा - कोरोना वाढल्याने यंत्रणेची धावपळ

शुभेंदु यांनी पुढे म्हटलं की, नंदीग्राम जिंकणे माझ्यासाठी काही मोठं आव्हान नाही. मी ममता बॅनर्जी यांना या ठिकाणी हरवणार आहे, आणि त्यांना कोलकात्याला पाठवणार आहे, हे नक्की. मला जी जबाबदारी दिली गेलीय त्याबाबत मी राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानतो. मी पूर्ण पश्चिम बंगाल आणि नंदीग्राममध्ये कमळ फुलवण्याचे काम करेन. ममता बॅनर्जी या निवडणुकीत 50 हजारांहून अधिक मतांनी हारणार आहेत, असा दावाही त्यांनी केला. भाजपने काल शनिवारी नंदीग्राममधून टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्याविरोधात शुभेंदु अधिकारी यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे या जागेवरची निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण बनली आहे. शुभेंदु अधिकारी याआधी टीएमसीमध्ये होते तसेच ते नंदीग्राममधूनच आमदार होते. मात्र, निवडणुकीच्या आधीच त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 

हेही वाचा - Corona : भारतात काल 18,711 नवे रुग्ण; महाराष्ट्रात येणार केंद्राची विशेष पथके

भाजपाची यादी तृणमूलच्या यादीनंतर दोन दिवसांनी जाहीर झाली आहे. टीएमसीने 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच तीन जागा सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चासाठी सोडल्या आहेत. राज्यात एकूण 294 जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suvendu adhikari west bengal will turn kashmir if tmc comes back to power