द्रमुकची मुसंडी; तमिळनाडूच्या राजकारणात कुणाचं किती आहे वजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रमुकची मुसंडी; तमिळनाडूच्या राजकारणात कुणाचं किती आहे वजन

द्रमुकची मुसंडी; तमिळनाडूच्या राजकारणात कुणाचं किती आहे वजन

चेन्नई : तमिळनाडूमध्ये सध्या द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही आघाडीच्या पक्षांमध्ये अत्यंत घासाघाशीची टक्कर होताना दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांपैकी द्रमुक सध्या आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये 234 जागांसाठी ही विधानसभेची निवडणूक होत आहे. आज तब्बल 4,218 उमेदवारांचं भविष्य निश्चित होणार आहे. राज्यात सत्ता गाठण्यासाठी 118 जागांचा टप्पा गाठणे महत्त्वाचे आहे. 2016 साली जयललिता यांचं तर 2018 साली करुणानिधी यांचं निधन झालं. हे दोन्हीही चेहरे या राज्यातील राजकारणातले बडे चेहरे होते. दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक होते. त्यामुळे, एम करुणानिधी आणि माजी मुख्यमंत्री जयललिथा यांच्या मृत्यूनंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. सध्या करुणानिधी यांचे कनिष्ठ चिरंजीव एम के स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक तर विद्यमान मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखील अण्णा द्रमुक हा पक्ष लढतो आहे.

सहा एप्रिल रोजी राज्यात एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदानात तब्बल 72.78 टक्के मतदारांनी मतदान केलं आहे. एक्झिट पोल्समध्ये आलेल्या आकडेवारीनुसार, DMK या राज्यात मुसंडी मारणार असल्याचं चित्र आहे. एम के स्टालिन आणि त्यांचे सहकारी पक्ष या ठिकाणी या निवडणुकीत बाजी मारतील, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्सनी मांडला आहे. डीएमकेला या ठिकाणी 160 जागा मिळतील तर एआयडीएमकेला याठिकाणी 66 जागा मिळतील असा अंदाज आहे. एनडीए अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाखाली तर सेक्यूलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स याठिकाणी द्रमुकच्या नेतृत्वाखाली लढत आहे. या दोन प्रमुख पक्षांव्यतिरिक्त या ठिकाणी अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम (AMMK) हा पक्ष तर अभिनयातून राजकारणात उतरलेला कमल हसन यांचा मक्कल निधी मय्यम (MNM) हा पक्ष स्पर्धेत आहे. अण्णा द्रमुक 2011 पासून सत्तेत आहे. दहा वर्षांनंतर राज्यातील अस्थिरता आणि एँटी-इन्कम्बन्सीचा फायदा घेत द्रमुक सत्तेची स्वप्नं पाहतो आहे.

तमिळनाडूतील 2016 मधील काय होती स्थिती?

2016 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अण्णाद्रमुक पुन्हा सत्तेवर आला होता. याआधी 2011 सालच्या निवडणुकीत देखील याच पक्षाने बाजी मारली होती. 2016 साली अण्णा द्रमुक पक्षाला 123 जागा मिळाल्या होत्या. भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. तर काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळवता आला होता.

कमल हसन यांची स्वतंत्र आघाडी

तमिळनाडू राज्याच्या या आधीच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. जयललिता आणि करुणानिधी या अनेक वर्षांपासून तामिळनाडूच्या राजकारणाचा चेहरा ठरलेल्या या दोघांची जागा घेण्यास सध्या तरी कोणी तयार नव्हतं, अशा काळात कमल हसन यांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत ते स्वत: दक्षिण कोयंबतूर मतदारसंघात उभं राहिले आहेत. एमएनएमने या निवडणुकीत 142 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमल हसन यांच्या नवख्या पक्षाने राज्यातील 3.72 टक्के व्होट शेअर घेतले होते. निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला 'टॉर्चलाईट' हे निवडणूक चिन्ह देऊ केलं आहे. 2021 च्या या निवडणुकीत द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन बड्या पक्षांना टक्कर देण्यासाठी कमल हसन यांनी अनेक लहान पक्षांशी हातमिळवणी केली आहे. या युतीला त्यांनी आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी 'मक्कलीन मुधल कुटानी' (Makkalin Mudhal Kootani) असं नाव दिलं आहे. ही आघाडी तब्बल 227 जागांवर निवडणूक लढवत आहे. मक्कल निधी मय्यम या निवडणुकीत 142 जागांवर निवडणूक लढवत आहे. टी आर पारीवेंधर यांच्या नेतृत्वातील इंधीया जननयगा काटची (IJK) हा पक्ष 40 जागा लढवत आहे तर आर. सरथकुमार यांच्या नेतृत्वातील ऑल इंडिया समथुवा मक्कल काटची (AISMK) हा पक्ष 33 जागांवर निवडणूक लढवत आहे.