VIDEO : उधमसिंह यांनी जनरल डायरचीच हत्या केली होती का?

udham singh take revenge of jallianwala bagh massacre
udham singh take revenge of jallianwala bagh massacre

नागपूर : तब्बल १०२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १३ एप्रिल १९१९ ला अमृतसर शहरात हजारो लोकांची गर्दी जमली होती. निमित्त होतं बैसाखी सणाचं. याच काळात रौलेट कायद्याचा निषेध करणाऱ्या सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक केली होती, तर आंदोलकांवर गोळ्याही चालवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्व जनता पेटून उठली होती. सरकारचा निषेध करण्यासाठी बैसाखीनिमित्त शहरात आलेले हजारो लोक जालियनवाला बागेत विश्रांती करत वक्त्यांची भाषणे ऐकत होती. पण, सूर्यास्ताला पाच मिनिटे बाकी असताना ५० जणांची फौज सशस्त्र वाहनांसह दाखल झाली. मागे वळून पाहताच बुटांचा आवाज आला. जनरल डायरने आदेश दिला...'फायर' अन् क्षणार्धात प्रेतांचा खच पडला. त्यानंतर एका तरुणानं या हत्याकांडाचा बदला घेण्याची शपथ घेतली. 

नेमकं काय घडलं होतं जालियनवाला बागमध्ये?

रौलट कायद्याचा शांतपणे निषेध करण्यासाठीच हा मोठा जनसमुदाय जालियनवाला बागेत जमलेला होता.  जनरल डायरसह ५० जणांची फौज आणि दोन सशस्त्र वाहनांनी जालियनवाला बागेत प्रवेश केला. या फौजेत 25 गुरखा सैनिक आणि 25 बलूच सैनिक होती. यावेळी डायरने जालियनवाला बागेत भरलेली सभा ही परवानगीनुसार नव्हती, असेही सांगितले नाही. तसेच लोकांना शांतपणे निघून जाण्याचे आदेशही दिले नाहीत. डायरने एकच आदेश दिला, तो म्हणजे...फायर... अन् क्षणार्धात रायफली धडाडू लागल्या. लोकांची पळापळी सुरू झाली. मात्र, पळून पळून जाणार कुठे? सर्वत्र तटबंदी होती. एकच अरुंद दरवाजा होता, तिथूनही गोळ्यांचा मारा सुरू होता. अनेकांनी बागेच्या मध्यभागी असलेल्या विहिरीत उड्या घेतल्या. तब्बल १० मिनिटे या निष्पाप लोकांवर गोळ्यांचा मारा सुरूच होता. १६५० राऊंड फायर केल्यानंतर हा गोळीबार थांबला. पण मैदानात प्रेतांचा खच पडला होता. कोणी मदतीसाठी विव्हळत होतं, तर कोणी कायमच जग सोडून गेलं होतं.  मात्र, कायर अन् निष्ठूर डायरने त्यांचा थोडासाही विचार केला नाही. त्या भागात जाण्यास बंदी घातली अन् जखमी लोकांनाही उपचाराविना मारलं गेलं. या गोळीबारात एकूण 379 लोक मारले गेल्याचं हंटर समितीने म्हटलं. पण इथे प्रत्यक्षात 1000 जण मारले गेल्याचं म्हटलं जातं, तर 4 ते 5 हजार जण जखमी जालेले होते.

जालियनवाला बाग हत्याकांचा बदला घेणारा तरुण -
जालियनवाला बाग हत्याकांड झाले अन् त्याच दिवशी एका तरुणानं बदल्याची शपथ घेतली. या तरुणाचे नाव होते उधम सिंग. त्यांना बदला घेण्यासाठी तब्बल २१ वर्ष वाट पाहावी लागली. अखेर तो दिवस उजाळला. १३ मार्च १९४० चा तो दिवस होता. सायंकाळची वेळ होती. लंडनमधील कैक्सटन हॉलमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन अन् रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची बैठक भरली होती. अनेकजण या सभेमध्ये उपस्थित होते. त्यातच ओव्हरकोटमध्ये एक पुस्तक लपवून बसलेली व्यक्त बसली होती, ती म्हणजे उधम सिंह. बैठक संपली आणि लोक जायला लागले. त्याचवेळी उधम सिंह यांनी बंदूक काढली अन् थेट पंजाबचे माजी गर्व्हनर मायकल ओ डायर यांच्यावर निशाणा साधला. डायर त्याच ठिकाणी मारला गेला अन् जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला पूर्ण झाला. यावेळी उधम सिंह यांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. ब्रिटीश पोलिसांनी त्यांना अटक केली. ३१ जुलै १९४० त्यांना फाशी देण्यात आली. या हत्याकांडाचा बदला जरी घेतला, तरीही या कटू आठवणी आजही मनात घर करून बसल्यात हे मात्र नक्की.

कसा झाला जनरल डायरचा मृत्यू?
जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबाराचा आदेश देणाऱ्या जनरल डायरचा जन्म भारतातच झाला होता. त्याला ऊर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषा व्यवस्थित येत होत्या. त्यामुळे त्याच्यावर तुकडीचं नेतृत्व सोपविलं होतं. त्याने गोळीबार करण्यासाठी मशीन गनचा वापर केला आणि जालियनवाला बागेचा रस्ता बंद केला असल्याचे हंटर कमिशनसमोर मंजूर देखील केले होते. मात्र, ब्रिटेनमध्ये जनरल डायरकडे सन्मानाने पाहिले गेले. डायरचा १९२७ मध्ये लकवा आणि अन्य आजारांनी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देखील करण्यात आल्याचे सांगितले जाते. अनेकजण मानतात की, उधम सिंह यांनीच जनरल डायरची हत्या केली होती. मात्र, उधमसिंह यांनी मारलेला हा मायकल ओ डायर होता आणि हा पंजाबचा गर्व्हनर होता.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com