esakal | लॉकडाउनमुळे पडलाय बेरोजगारीचा 'टॉप गिअर'; भारतातील बेरोजगारीचा दर पोहोचला...!
sakal

बोलून बातमी शोधा

Unemployment

दिलासा देणारी बाब म्हणजे 20 एप्रिलनंतर 58 लाख लोक शेती आणि शेतीशीसंबंधित कामांमध्ये गुंतले आहेत.

लॉकडाउनमुळे पडलाय बेरोजगारीचा 'टॉप गिअर'; भारतातील बेरोजगारीचा दर पोहोचला...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात राज्यराज्यांमधून स्वगृही परतणाऱ्या मजुरांचे चित्र सध्या सगळीकडे दिसते आहे. त्यावरून देशातील बेरोजगारीचे चित्र स्पष्ट होते आहे. बेरोजगारीचा 'टॉप गिअर' पडल्याचे यातून प्रतीत होते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातील बेरोजगारी दर नुकत्याच सरलेल्या आठवड्यात 27.1 टक्क्यांवर पोचला आहे. त्या आधीच्या आठवड्यात तो 21.1 टक्के होता. तर एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर 23.5 टक्के होता. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन आहे. त्यामुळे बहुतांश उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा फटका बसत एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या पहिल्या तीन दिवसात बेरोजगारीदर वाढला आहे. आता लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे रोजगारावर त्याचा आणखी विपरित परिणाम होणार आहे, अशी माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी दिली आहे.

12.5 कोटी लोकांनी गमावला रोजगार

सीएमआयईच्या मते, एप्रिल महिन्यात 12.5 कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. यापैकी 9.13 कोटी लोक हे असंघटित म्हणजे मजूर वर्गात आणि लहान व्यापरांकडे काम करत होते. याशिवाय 1.82 कोटी व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद झाले आहेत. तसेच 1.78 कोटी लोक निश्चित वेतनावर काम करत होते ते एप्रिल अखेर बेरोजगार झाले आहेत.

दिलासा देणारी बाब म्हणजे 20 एप्रिलनंतर 58 लाख लोक शेती आणि शेतीशीसंबंधित कामांमध्ये गुंतले आहेत.

- लॉकडाउनमध्येही बँकांच्या शेअरमध्ये आली तेजी; बाजारात घसरणीला लागला 'ब्रेक'!

दर महिन्यात वाढतोय बेरोजगारीचा आकडा:

बेरोजगारीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 15 मार्चपर्यंत बेरोजगारीचा दर 6.74 टक्के होता. यानंतर 19 एप्रिलपर्यंत हा दर 26.19 टक्क्यांवर पोचला. मात्र 19 एप्रिलनंतरच्या आठवड्यात बेरोजगारी दर थोडा कमी होत 21.05 टक्के झाला होता. मात्र त्यांनतर, एप्रिल अखेरपर्यंत हा दर 23.5 टक्क्यांवर पोचला. 3 मेपर्यंत हा दर 27.1 टक्क्यांवर पोचला आहे. आकडेवारीवरून स्पष्ट होते की, लॉकडाऊननंतर बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

लॉकडाउनचा परिणाम प्रत्येक क्षेत्रातील संघटित आणि असंघटित कामगारांवर तसेच क्षेत्रावर झाला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आणखी वाढ झाल्यास रोजगाराची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात नागरिकांनी रोजगार गमावला आहे. 

बहुतांश स्टार्ट अप कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. 2800 आयटी कंपन्यांची संघटना असलेल्या नॅसकॉमने देखील मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कपातीचे संकेत दिले आहेत.

राज्य सरकारच्या नवीन भरती न करण्याच्या आदेशाचा विद्यार्थ्यांना झटका

तमिलनाडू, झारखंड आणि बिहारमध्ये सर्वाधिक बेरोजगारी:

बेरोजगारीने देशातील प्रत्येक राज्यातील लोकांना प्रभावित केले आहे. मात्र देशातील मोठ्या राज्यांमध्ये तामिळनाडू आघाडीवर आहे. तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या  क्रमांक झारखंड आणि बिहारचा लागते. तामिळनाडूमध्ये बेरोजगारीचा दर 49.8 टक्क्यांवर पोचला आहे. तर झारखंडमध्ये 47.1 टक्के आणि बिहारमध्ये 46.6 टक्के आहे. पंजाबमध्ये बेरोजगारीचा दर सर्वात कमी आहे. तर त्यापाठोपाठ छत्तीसगड आणि तेलंगानाचा क्रमांक लागतो. पंजाबमध्ये बेरोजगारी दर 2.9 टक्के, छत्तीसगड 3.4 टक्के आणि  तेलंगानामध्ये बेरोजगारी दर 6.2 टक्के आहे.

रिटेल क्षेत्राचे 5.5 लाख कोटींचे नुकसान

लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ झाल्याने येत्या काही महिन्यात 20 टक्के व्यवसायिकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार आहे, अशी माहिती व्यापारी संघटना काँफेडरेशन ऑफ ऑल इंडियाने (सीएआयटी) दिली आहे. लॉकडाऊनच्या 25 मार्च ते 30 एप्रिलच्या दरम्यान रिटेल क्षेत्राचे 5.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

- कोरोनामुळे ग्राहक मंचातील दाव्यांना मिळणार ४ महिन्यानंतरची तारीख

देशातील एकूण 7 कोटी 
व्यावसायिकांपैकी 1.78 कोटी व्यावसायिकांना येत्या काही महिन्यात कायम स्वरूपी व्यवसाय बंद करावा लागण्याची शक्यता आहे. तर 1.78 कोटी व्यावसायिकांनावर अवलंबून असलेल्या 75 लाख व्यावसायिकांना नजीकच्या काळात फटका बसण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांची बिकट परिस्थिती असून बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते सुरू असून उत्पन्न मात्र घटले आहे.

केंद्र आणि राज्य सरकरांनी नॉन कॉर्पोरेट क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) या क्षेत्राचा सुमारे 40 टक्के वाटा आहे. तर देशातील एकूण मनुष्यबळाच्या एक तृतीयांश मनुष्यबळ या क्षेत्रात कार्यरत आहे.

- रिटेल क्षेत्रात 7 कोटी व्यावसायिक कार्यरत

-जीडीपीमध्ये सुमारे 40 टक्के योगदान

- देशातील एकूण मनुष्यबळाच्या एक तृतीयांश मनुष्यबळ या क्षेत्रात कार्यरत

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा