esakal | उत्तर प्रदेश : आमदार सुरेश श्रीवास्तव यांच्यानंतर पत्नीचेही निधन, मुलाची प्रकृती गंभीर

बोलून बातमी शोधा

MLA Suresh Shrivastava

उत्तर प्रदेश : आमदार सुरेश श्रीवास्तव यांच्यानंतर पत्नीचेही निधन, मुलाची प्रकृती गंभीर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लखनऊ : उत्तर प्रदेशात कोरोनामुळे हाहाकार उडाला असून राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती राजधानी लखनऊमध्ये निर्माण झाली आहे. रविवारी भाजपा आमदार सुरेश श्रीवास्तव यांच्या पत्नी मालती यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच आमदार श्रीवास्तव यांचाही कोरोनामुळं मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांची पत्नी आणि मुलालाही संसर्ग झाला होता. त्यांच्या मुलाचीही प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: ब्रिटन, सिंगापूरकडून ऑक्सिजन-व्हेंटिलेटर्सची पहिली खेप भारताकडे रवाना

लखनऊ पश्चिम मतदारसंघातील आमदार असलेले सुरेश श्रीवास्तव यांना कोरोनाच्या संसर्गानंतर लखनऊच्या संजय गांधी आयुर्विज्ञान संस्थानमध्ये भरती करण्यात आलं होतं. याठिकाणी त्यांना सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नी मालती यांच्यावर सेंट जोसेफ रुग्णालयात उपचार सुरु होते, याठिकाणी उपचारांदरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: पुण्यासाठी ३५ हजार लस उपलब्ध; सोमवारी लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता

उत्तर प्रदेशात कोरोनाच्या वेगानं वाढत्या संक्रमणामुळं हाहाकार माजला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये औरेयाचे भाजपा आमदार रमेश दिवाकर आणि उत्तर प्रदेश सरकारमधील राज्यमंत्री हनुमान मिश्रा यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. याशिवाय राज्याचे अनेक आमदार आणि मंत्री देखील कोरोनाने संक्रमित झाले आहेत. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे.

हेही वाचा: उमर खालिद करोना पॉझिटिव्ह; तिहार तुरुंगात झाली लागण

उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत कोरोनाची ३५,६१४ नवी प्रकरणं समोर आली आहेत. राज्यात आता २,९७,६१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आत्तापर्यंत ११,१६५ लोकांचा या महामारीमुळं मृत्यू झाला आहे.