कँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक कोंडी आणखी वाढणार | Vehicle Entry Fees | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vehicle Entry Fees

कँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक कोंडी आणखी वाढणार

कँटोन्मेंट : पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंटसह देशातील सर्व कँटोन्मेंट हद्दीतून (Cantonment Zone) प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क (Vehicle Entry Fees) आकारणे थांबविण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने सर्व कँटोन्मेंट बोर्डांना दिल्या आहेत. त्यामुळे कँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक कोंडी आणखी वाढणार आहे.

मात्र अद्याप पुणे कँटोन्मेंट बोर्डाला हा निर्देश आला नसल्याचे अधिकारी यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होत आहे. संरक्षण मालमत्ता विभागाचे सहायक महासंचालक (कँटोन्मेंट) दमण सिंग यांनी याबाबतचे पत्र लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला आणि संरक्षण मालमत्ता विभागाच्या पुणे प्रधान संचालक कार्यालयाला पाठविले आहे. कँटोन्मेंट कायदा २००६नुसार वाहन प्रवेश शुल्क आकारणी केली जात होती.

हेही वाचा: पुण्यात बाधितांपैकी फक्त ५.४८ टक्केच लोकं रुग्णालयात दाखल

जीएसटी लागू झाल्यानंतर कँटोन्मेंट बोडाँकडून ‘एलबीटी'सह वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आली. लष्कर भागातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून २० ते ७० रुपयांचे प्रवेश शुल्क घेतले जात होते. मात्र, आता संरक्षण मालमत्ता विभागाने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे व्यावसायिक वाहनांची याकराच्या कचाट्यातून सुटका झाली आहे,तर जीएसटीचा वाटा मिळत नसल्याने हवालदिल असलेल्या कँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक कोंडी आणखी वाढणार आहे.

खडकी कँटोन्मेंट बोर्डाला 16 कोटी चे नुकसान सोसावे लागणार - प्रमोद कुमार

वाहन प्रवेश शुल्क (व्हेईकल एन्ट्री फी) आकारणी थांबविण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने सर्व कँटोन्मेंट बोर्डांना दिल्याने रविवारी दुपारपासून खडकी कॅन्टोमेंट हद्दीतील सर्व 16 बूथ बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार यांनी सकाळशी बोलताना दिली.

तसेच संरक्षण मंत्रालयाच्या या आदेशामुळे बोर्डाला तब्बल सोळा कोटी रुपयाचे नुकसान सोसावे लागणार असल्याचे ही कुमार यांनी सांगितले. दरम्यान या नवीन आदेशामुळे खडकी परिसरात चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसत होते. वाहन प्रवेश शुल्कापोटी बोर्डाला मिळणारी रक्कम आता बोर्ड हद्दीतील नागरिकांकडून वसूल केली जाते की काय अशी शंका नागरिक व्यक्त करत होते. दरम्यान या आदेशामुळे आधीच तोट्यात चाललेल्या खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या तिजोरीवर आणखी बोजा पडणार आहे हे मात्र नक्की.

अमित कुमार ( पुणे कँटोन्मेंट बोर्ड, सी ई ओ)

व्हेईकल एन्ट्री टॅक्सचा निर्देश सध्या देहूरोड व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी लागू होत आहे. सध्या आम्हाला कुठलाही निर्देश आलेला नाही. त्यामुळे तो आमच्यावर लागू होत नाही. व्हेईकल एन्ट्री फीस ही बोर्डाच्या स्तरावर असून त्याचा निर्णय फक्त बोर्डच घेऊ शकते. व्हेईकल एन्ट्री टॅक्स करिता केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा लागतो. म्हणून आम्ही सध्या ते बंद करू शकत नाही. आम्ही आशा करतो की, पुढील आठवड्यात किंवा लवकरात लवकर हा निर्देश आम्हाला देखील येऊ शकतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh news
loading image
go to top