वाहनांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफरच्या नियमामध्ये सरकार करणार मोठा बदल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफरची प्रक्रिया आणखी सोपी बनवण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. 

नवी दिल्ली - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफरची प्रक्रिया आणखी सोपी बनवण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावांतर्गत वाहनांच्या रजिस्ट्रेशनवेळी नॉमिनीचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. वाहतूक मंत्रालयाने गुरुवार याबाबत एक अधिसूचना जारी करून माहिती दिली आहे. 

वाहन मालकाच्या कुटुंबातील सदस्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. एखाद्यावेळी वाहनमालकाचा मृत्यू झाल्यास गाडी कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर नोंद करणं सोपं होणार आहे. प्रस्तावानुसार, वाहन मालकाला व्हेरिफिकेशनसाठी नॉमिनीच्या ओळखीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतील. तसंच पोर्टलवर वाहन मालकाच्या मृत्यूचा दाखला अपलोड करावा लागेल. 

हे वाचा - गुजरातमधील कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूत आग; 5 रुग्णांनी गमावला जीव

वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अचानक मृत्यू झाल्यास कार, बाइक, स्कूटरसह इतर वाहनांचे मालकी हक्क दुसऱ्याच्या नावावर करताना कुटुंबियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एका मोठ्या प्रक्रियेतून कुटुंबाच्या सर्व सदस्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतर वाहन दुसऱ्याच्या नावावर नोंद करता येते. या अडचणी पाहून सरकारने पाऊल उचललं आहे. तसंच प्रत्येक राज्यात वाहन हक्क हस्तांतरणाचे नियम वेगवेगळे आहेत. 

सध्याच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार 90 दिवसांच्या आत गाडीच्या मालकी हक्काचे हस्तांतरण व्हायला हवे. या कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर प्रत्येक महिन्याला 500 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसंच याहून अधिक काळ गेल्यास हाच दंड हजारो रुपयांपर्यंत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत कुटुंबासमोर गाडी विकताना अनेक अडचणी निर्माण होतात. ती इतर कोणाला विकण्याऐवजी भंगारात देणं हाच पर्याय राहतो. 

हे वाचा - भारतीय नौदलाचं मिग-29के विमान अपघातग्रस्त; पायलटसाठी शोधमोहीम सुरु

मंत्रालयाने 50 वर्षांपेक्षा जुन्या दुचाकी आणि चार चाकी वाहनांची नोंदणी प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी व्हिंटेज वाहन रुपात नोंदणीचा प्रस्ताव दिला आहे. अशा वाहन मालकांना 10 वर्षांसाठी 20 हजार रुपये देऊन वाहनांची नोंदणी करू शकतात आणि रिन्यूल फी 5 हजार रुपये असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vehicle-registration-transfer of-ownership-rules changing proposal