भारत-बांग्लादेश, बदलते वारे

bangladesh india modi haseena
bangladesh india modi haseena

कोविड-19 च्या काळात गेले वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे करण्याचे टाळले.  त्यांच्या परदेश दौऱ्याची सुरूवात आता शेजारी राष्ट्रापासून होत असून, येत्या 26 व 27 मार्च रोजी ते बांग्लादेशला भेट देणार आहे. 2021 मध्ये स्वातंत्र्य मिळून बांग्लादेशला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. देशाचे पितामह व पहिले अध्यक्ष शेख मुजिबूर रहमान यांच्या हत्येलाही 46 वर्ष पूर्ण होतील. त्यांची कन्या शेख हसीना देशाच्या पंतप्रधान असून, स्वातंत्र्याच्या अर्धशतकाच्या साजऱ्या होणाऱ्या महोत्सवाला मोदी उपस्थित राहणार आहेत. 
भेटीची पूर्वतयारी करण्याच्या उद्देशाने परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी नुकतीच ढाक्याला भेट देऊन शेख हसीना तसेच परराष्ट्र मंत्री ए.के.अब्दुल मोमेन यांच्याबरोबर चर्चा केली. भारताच्या नेबरहूड फर्स्ट या धोरणाच्या अंतर्गत आखण्यात आलेल्या भेटीमुळे गेले दोन अडीच वर्ष शीतपेटीत पडलेल्या संबंधांना पुन्हा उजाळा मिळाला असून, मोदी यांचा दौरा अनेकार्थाने महत्वपूर्ण ठरणार आहे.

या संदर्भात बांग्लादेशचे उप-परराष्ट्र मंत्री एम. शहरयार आलम म्हटले आहे, की 17 ते 26 मार्च दरम्यान बांग्लादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत व बांग्लादेशदरम्यान राजदूतीय संबंध प्रस्थापित होऊनही पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने ढाक्यातील भारतीय उच्चायुक्ताच्या कार्यालयानेही भोज आदी कार्यक्रम आयोजित केला आहे. भेटी दरम्यान, मोदी व हसीना, ढाका ते पश्चिम बंगालमधील न्यू जलपैगुरी या मार्गावरील रेल्वेचे उद्घाटन करणार आहेत. याआधी, 17 डिसेंबर रोजी मोदी व हसीना यांच्या व्हिडिओद्वारे झालेल्या शिखर परिषदेत हल्दिबारी ते चिलाताई दरम्यान रेल्वेसेवेला हिरवा कंदील दाखविला होता. जानेवारीमध्ये बांग्लादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन यांनी भारताला भेट देऊन दुतर्फा संबंधाचा आढावा घेतला व मोदी यांच्या दौऱ्याबाबत चर्चा केली होती.   

गेल्या ऑगस्टमध्ये मोदी सरकारने संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक व राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा सम्मत केल्यावर बांग्लादेशने नाराजी व्यक्त केली होती. शिवाय, गृहमंत्री अमित शहा यांच्या, -घुसखोर (टर्माइट- वाळवी) वेचून वेचून बाहेर काढले जाईल, या विधानाला आक्षेपही घेण्यात आला होता. बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री, तसेच अन्य दोन मंत्र्यांनी भारताचे नियोजित दौरे रद्द केले होते. त्यामुळे, दुतर्फा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय, अनेक प्रयत्न व वाटाघाटी होऊनही तीस्ता (नदी पाणी वाटप) चा प्रश्न न सुटल्याने दोन्ही बाजूंची बोलणी थंड पडली होती. या पार्श्वभूमीकडे पाहता, मोदी यांच्या भेटीत वातावरण निवळेल, अशी अपेक्षा राजदूतीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. 

दिल्लीतील बांग्लादेश उच्चायुक्ताच्या कार्यालयातील वृत्तविभागाचे मंत्री शाबान महंमद यांच्याबरोबर काल झालेल्या निवडक पत्रकारांच्या भेटीदरम्यान, ते म्हणाले, की मोदी यांच्या भेटीत अऩेक गोष्टींना उजाळा मिळेल. बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भारताने महत्वाची भूमिका बजावली, याची जाणीव आम्हाला आहे. दोन्ही देशांच्या संपर्क व संबंधवृद्धीच्या दृष्टीने मोदी यांच्या भेटीकडे पाहावे लागेल. शिवाय कोविड- 19 च्या प्रादुर्भावानंतर पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी बांग्लादेशला प्राधान्य दिले, याबाबत आम्हाला समाधान आहे. मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची हसीना यांनी प्रशंसा केली आहे. बांग्लादेशच्या निर्मितीपासून दोन्ही देशांची नाळ एकमेकांशी जोडलेली आहे. आपण केवळ भूभागाने जोडलेलो नाही, तर सुमारे पन्नास एक नद्यांनी जोडलेलो आहोत. बांग्लादेशच्या विकासाला व स्थैर्याला भारताने हातभार लावला. तसंच, पाकिस्तान प्रणित दहशवादाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशात सहकार्य आहे. 

शाबान म्हणाले, की गेल्या काही वर्षात बांग्लादेशची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर असल्याने देशाचा दर्जा 'अविकसित राष्ट्र' यावरून आता 'विकसनशील राष्ट्र' झाला आहे. 2019 मध्ये विकासाचा दर 8.2 टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तयार कपड्यांच्या निर्यातीत बांग्लादेशने अनेक देशांना मागे टाकले असून, तेथील कपडे युरोप, अमेरिकेतील मॉल्स व बाजारपेठातून गेले काही वर्ष ग्राहकांना मिळत आहेत. त्यांचा दर्जाही उत्तम असतो. बांग्लादेशच्या विकासाचा इतका प्रभाव आहे,  की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बांग्लादेशच्या विकासाच्या मॉडेलचे अनुकरण करावे लागेल, अशी कबूली पाकिस्तानच्या संसदेत दिली. पाकिस्तानच्या बांग्लादेशातील हस्तक्षेपाबाबत विचारता शाबान म्हणाले, की विरोधी पक्ष व दहशतवादी तत्वांना पाकिस्तानकडून मदत मिळते, हे आता लपून राहिलेले नाही.

शेख हसीना यांनी कोविड 19 च्या काळात देशाला सर्वोत्तम नेतृत्व दिले, याबाबत राष्ट्रकुल संघटनेने त्यांचा अलीकडे गौरव केला आहे. काल जागतिक महिला दिन साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल संघटनेच्या लंडनमधील महाचिटणीस पॅट्रिशिया स्कॉटलँड यांनी नेतृत्व देणाऱ्या तीन महिला नेत्यांचा उल्लेख व गौरव केला. त्यात शेख हसीना यांच्या व्यतिरिक्त न्यूझिलँडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डेन, बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया आमोर मॉटली यांचा समावेश आहे. 

बांग्लादेशच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकात हसीना यांच्या आवामी लीग या पक्षाला मतदाराने भरघोस यश मिळवून दिले. जानेवारी 2009 पासून त्या पंतप्रधानपदावर आहेत. त्यांच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही, असा दावा शाबान महंमद करतात. काही कडव्या मुस्लिम संघटनांना पाकिस्तानचा पाठिंबा मिळत असला, तरी त्यांचा प्रभाव वाढलेला नाही. माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचा बांग्लादेश नॅशनल पार्टी हा प्रमुख विरोधी पक्ष असून, त्यांच्याविरूद्ध भ्रष्टाचार, गैरव्यवहार, सत्तेचा गैरवापर आदी कारणांवरून अनेक खटले न्यायप्रविष्ट आहेत. बांग्लादेशमधील उच्च व सर्वोच्च न्यायालयांनी आजवर त्यांचा जामीन अर्ज चार वेळा फेटाळला. दरम्यान, 25 मार्च 2020 रोजी त्यांना सहा महिन्यासाठी मुक्त करण्यात आले, तथापि, त्या आपल्या निवासस्थानी राहतील व परदेश दौरा करू शकणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. या व्यतिरिक्त जनरल कै महंमद इर्शाद यांचा जातीय पक्ष हसीना यांचा विरोधक असला असला, तरी हसीना यांच्या कारकीर्दीत इर्शाद यांच्या पक्षाने अन्य समविचारी पक्षांशी हातमिळवणी करूनही आवामी लीगचा सामना करण्यात त्याला यश आले नाही.

मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान वाणिज्य, रेल्वे, रस्ते बांधणी, हिंदी महासागरातील सहकार्य आदींबाबत समझोते होतील. चीनबरोबरही बांग्लादेशचे चांगले संबंध आहेत. तथापि, भारताबरोबर असलेल्या संबंधांच्या ते कधीच आड येणार नाहीत, अशी ग्वाही शाबान महंमद देतात. तसेच, रोहिंग्यांच्या प्रश्नाचा सरकारतर्फे विचार चालू असून, त्यांच्या पुनर्वसनावर लक्ष दिले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com