हाथरस बलात्कार पीडितेचा व्हायरला होणारा फोटो खोटा; फॉरवर्ड करण्याआधी वाचा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 1 October 2020

वास्तविकत: अशा प्रकरणातील पीडीतेचे नाव आणि फोटो जाहिर करणे, हा कायद्याने गुन्हा आहे.

हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. पीडीतेच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरातूनच संताप उफाळून आला असून पीडीतेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी समाजमाध्यमात जोर धरत आहे. ही मागणी होत असताना पीडीतेचे नाव आणि तिचा फोटोही व्हायरल होत आहे. वास्तविकत: अशा प्रकरणातील पीडीतेचे नाव आणि फोटो जाहिर करणे, हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, हाथरस प्रकरणातील पीडीता म्हणून ज्या तरुणीचा फोटो सध्या व्हायरल होत आहे, तो तिचा नसल्याचीच माहिती समोर आली आहे. 

काय आहे दावा?
फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीनुसार हा फोटो त्या हाथरसमधील पीडीतेचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात फॅक्ट चेकचे काही मार्ग वापरल्यानंतर ही बाब समोर आली आहे की, ज्या तरुणीचा फोटो व्हायरल होत आहे तो अजय जीतू यादव नावाच्या व्यक्तीच्या बहिणीचा फोटो आहे. त्याने 29 सप्टेंबर रोजी एक पोस्ट टाकून हा खुलासा केला की, सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला फोटो हा हाथरसमधील पीडीतेचा नाहीये. तो माझ्या बहिणीचा आहे. 2018 साली तिचे निधन झाले होते. चंदिगड येथील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला होता. या हलगर्जीपणाबद्दल संबधित डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी त्यावेळी तिच्या फोटोसह एक मोहिम चालवली गेली होती. मात्र आता तोच फोटो हाथरस प्रकरणाशी जोडला जात आहे. कृपया, असे करु नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

हेही वाचा - बेरोजगारीमुळेही बलात्कार घडतात; माजी न्यायाधीश काटजूंच्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण

पीडीतेचे फोटो शेअर करणे कायद्याने गुन्हा

जाणतेपणी किंवा अजाणतेपणी सोशल मिडीया युजरकडून अशापद्धतीने नाव आणि फोटो व्हायरल केल्याने पीडीता आणि पीडीतेच्या कुंटुंबियांच्या अधिकारांवर गदा येऊ शकते. याबाबत मानवाधिकार संघटनेच्या ह्युमन राइट वॉचच्या रिपोर्टने म्हटलंय की, पीडीतेच्या खासगीपणाच्या अधिकाराबद्दल देशातील लोकांमध्ये जागृती नाहीये. यामुळे पीडीतेला न्याय मिळताना संघर्ष करावा लागतो. 

हेही वाचा - धक्कादायक! हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू

काय आहे कायदा?
भारतीय दंडसंहितेच्या कलम 228 नुसार लैंगिक छळ अथवा बलात्कारामधील पीडीतांची ओळख ही गुप्तच ठेवावी लागले. ती उघड करता येत नाही. पीडीतांचे नाव छापणाऱ्या किंवा प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला याबाबत दोषी ठरवलं जातं. असं केलेलं आढळलं तर दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
पीडीतेची ओळख, तीची माहिती उघड केल्याने त्या व्यक्तीला अथवा तिच्या कुंटुंबियांना समाजात वावरताना अनेक आव्हानांचा तसेत मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. मात्र, या गोष्टीचे पालन होताना दिसत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Photo Doesnt Belong to Hathras case Fact Check