Delhi Violence : ईशान्य दिल्ली हळूहळू येतेय पूर्वपदावर; जाणून घ्या कशी आहे तेथील सद्यस्थिती!

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 2 मार्च 2020

दंगल आटोक्‍यात न आल्यामुळे राजकीय टीकेची झळ बसलेल्या दिल्ली पोलिसांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधातील निदर्शनांचा केंद्रबिंदू असलेल्या शाहीनबागमध्ये बंदोबस्त वाढविला आहे.

नवी दिल्ली : हिंसेच्या तांडवामुळे होरपळलेली ईशान्य दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. सोबतच दंगलीतील क्रौर्य आणि संकटकाळात दिसून आलेल्या मानवतेच्या कहाण्याही समोर येत आहेत. दिल्लीच्या गोकुळपुरी आणि भागीरथ विहारमध्ये पोलिसांना तीन मृतदेह रविवारी (ता.१) आढळून आल्याने दंगलीतील बळींची संख्या ४६ वर पोचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दंगलग्रस्त भागामध्ये फिरून पोलिसांनी आता नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच दंगेखोरांना हुडकणे आरंभले आहे. पोलिसांना एक मृतदेह गोकुळपुरीच्या नाल्यात आढळून आला. याच नाल्यात गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांचा मृतदेह सापडला होता, तर भागीरथी विहारच्या नाल्यामध्ये दोन मृतदेह सापडले.

या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसली, तरी या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दिल्लीत झालेल्या दंगलीतील मृतांची संख्या ४६ झाली असून, जखमींची संख्यादेखील २०० वर पोचली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत १६७ गुन्हे दाखल केले असून, अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ३६ गुन्ह्यांचीही नोंद झाली आहे. 

- बिहारमध्ये एनडीए २०० जागा जिंकेल : नितीशकुमार

पोलिसांनी आता सोशल मीडियावर फिरणाऱ्या चिथावणीखोर संदेशांविरुद्धही आक्रमक पवित्रा घेतला असून, याप्रकरणी १३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय तब्बल ९०३ जणांना अटक करण्यात आली आहे. आम आदमी पक्षाचा नगरसेवक ताहिर हुसेनच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. अंकित शर्मांच्या हत्येचा आरोप हुसेनवर असून, याप्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे शोध घेतल्याचे सांगण्यात आले. 

- अमृतसरच्या सुवर्ण मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय; लंगरच्या जेवणात होणार बदल

शाहीनबागमध्ये जमावबंदी 

दंगल आटोक्‍यात न आल्यामुळे राजकीय टीकेची झळ बसलेल्या दिल्ली पोलिसांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधातील निदर्शनांचा केंद्रबिंदू असलेल्या शाहीनबागमध्ये बंदोबस्त वाढविला आहे. या भागामध्ये पोलिसांनी रविवारी जमावबंदीचे १४४ कलम लागू केले. तसेच, रस्त्यावर ठिय्या देणाऱ्या महिलांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. या आंदोलनामुळे दिल्ली आणि नोएडाला जोडणाऱ्या कालिंदी कुंज मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

- खुशखबर! गॅस सिलेंडरच्या दरात कपात; नवे दर...

तीन मृतदेह आढळल्याने खळबळ 

दंगलीतील बळींची संख्या ४६ वर 
गोकुळपुरीतील नाल्यात एक मृतदेह आढळला 
भागीरथी विहारच्या नाल्यामध्ये दोन मृतदेह सापडले 
जखमींची संख्या २००च्या वर पोचली 
एकूण ९०३ जणांना पोलिसांकडून अटक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: West and South East Delhi Situation is in control says Cops