दीदी होत्या ओलीस राहण्यास तयार; यशवंत सिन्हांनी जागवल्या कंदहार प्रकरणाच्या आठवणी

कोलकता - भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
कोलकता - भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

कोलकता - कंदहार येथे इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणावेळी ममता दीदींनी थेट दहशतवाद्यांचा सामना करण्याची तयारी दर्शविली होती. त्यासाठी प्रसंगी ओलीस राहण्यासही त्या तयार होत्या, अशी माहिती आज माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिली. सिन्हा म्हणाले की, ‘विमान अपहरणाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असताना ममतांनी स्वतःलाच ओलीस ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. विमानातील ज्या प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आहे त्यांची सुटका करण्यासाठी त्या हे दिव्य करायला तयार झाल्या होत्या. प्रसंगी देशासाठी बलिदान देण्याचीही त्यांची तयारी होती.’’ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे टीकाकार आणि ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलला विजयी करणे ही काळाची गरज असून यामुळे २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांचा पराभव निश्‍चित होईल असे भाकीतही त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. देशाला वाचविण्यासाठी मोदींना पराभूत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्रिपद भूषविलेल्या सिन्हा यांनी विद्यमान पक्ष नेतृत्वासोबत झालेल्या मतभेदांनंतर २०१८ मध्येच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांचे सूपुत्र जयंत सिन्हा हे सध्या भाजपचे खासदार असून ते झारखंडमधील हजारीबाग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. यशवंत सिन्हा हे तृणमूल काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहेत. माध्यमांशी संवाद साधताना सिन्हा म्हणाले की, ‘मोदी- शहांच्या नेतृत्वाखाली देशाचे अस्तित्व धोक्यात आहे.

संस्था भक्कम झाल्या तरच लोकशाही देखील भक्कम होते. येथे मात्र सोयीस्कररित्या संस्थांनाच कमकुवत केले जात आहे. सध्या देश विचित्र स्थितीतून जातो आहे. ज्या मूल्यांना आपण अधिक महत्त्व देत होतो तीच मूल्ये आपल्या लोकशाहीची आधारशिला होते. सध्या कोणीच त्यांचे पालन करत नाही.’’ मागील अनेक दिवसांपासून शेतकरी दिल्लीजवळ आंदोलन करत आहेत पण केंद्र सरकारला मात्र त्याची फारशी चिंता दिसत नाही. कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंका हेच सत्ताधारी पक्षाचे लक्ष्य बनले आहे, असेही सिन्हा यांनी सांगितले. 

गोपाळ कृष्ण गोखले म्हणाले होते, बंगाल जो विचार आज करतो तोच विचार अवघा देश उद्या करतो. आताही बंगालच मोठ्या बदलाचे सूतोवाच करणार आहे. राज्यातील तृणमूलच्या विजयामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित होईल, असेही त्यांनी सांगितले

सिन्हा म्हणाले

  • वाजपेयी सर्वांच्या मतांचा आदर करत असत
  • मोदी- शहा हे विरोधकांनाच संपवून टाकतात 
  • वाजपेयींचा लोकांना सोबत घेण्यावर विश्‍वास होता
  • विद्यमान भाजपचे नेतृत्व लोकांना फक्त जिंकू पाहते
  • मोदी- शहांमुळे अनेक मित्र पक्ष भाजपला सोडून गेले
  • लॉकडाउनच्या काळात गरिबांचे मोठे हाल झाले
  • ममतांवरील हल्ल्यानंतर तृणमूलमध्ये येण्याचा निर्णय

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com