ममतांना झटका'; TMCच्या स्थापनेपासून सोबत असलेला खासदार होणार भाजपवासी?

Mamata_Banerjee_
Mamata_Banerjee_

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात होणार आहे. निवडणुका सुरु होण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जातंय की, टीएमसीच्या स्थापनेपासून सोबत असलेले सिसिर अधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करतील . सिसिर अधिकारी, नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना आव्हान देणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांचे वडील आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. शनिवारी सिसिर अधिकारी आणि भाजप नेते मनसुख मंडविया यांच्यात भेट झाली. आज पूर्व मेदनीपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांची रॅली होणार आहे. या रॅलीत ते कमळ हाती घेतील, असं सांगण्यात येत आहे. सिसिर अधिकारी भाजपमध्ये गेल्यास ममतादीदींसाठी तो मोठा झटका असेल. कारण ते त्यांचे जुने सहकारी आहेत.

अमित शहा यांच्या रॅलीत सामिल होण्यासाठी सिसिर अधिकारी यांना भाजपने निमंत्रण पाठवलं आहे. भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप नेते मनसुख मांडविया सिसिर अधिकारी यांना अमित शहांची आज होणारी रॅली आणि 24 मार्चला पंतप्रधान मोदी यांच्या होणाऱ्या रॅलीसाठी निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सिसिर अधिकारी यांनी सभेत सामिल होण्याची तयारी दाखवली असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

भाजपने निमंत्रण पाठवल्याच्या माहितीची पुष्टी सिसिर अधिकारी यांचे पुत्र आणि टीएमसी खासदार दिव्हेंदु अधिकारी यांनी केली आहे. त्यांनी सांगितलं की, भाजप नेतृत्वाने आमच्याशी चर्चा केली आहे. अमित शहांच्या रॅलीमध्ये सामिल व्हायचं का नाही याचा निर्णय रविवारी सकाळी घेण्यात येईल.  दिब्येंदु अधिकारी यांचे मोठे बंधू सुवेंदु अधिकारी यांनी मागील वर्षी अमित शहांच्या रॅलीदरम्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सौम्येंदु अधिकारी यांनीही टीएमसी सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. सिसिर अधिकारी यांनीही भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. शिवाय राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारासंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात कधीकाळी त्यांचे सहकारी असणारे आणि सध्या भाजपवासी झालेले सुवेंदु अधिकारी मैदानात आहेत. सुवेंदु अधिकारी ममतादीदी यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होईल, असं सांगितलं आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com