मोरारजी, अटलजी अन् आता मोदी; रागात बड्यांशी पंगा घेवून यशस्वी झालेल्या ममता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banarjee

एकदा चिडून आणि रुसून ममता बॅनर्जी बंगालला निघून गेल्या. त्यावेळी त्यांना समजवायला खुद्द अटलजींना यावं लागलं होतं.

मोरारजी, अटलजी अन् आता मोदी; बड्यांशी पंगा घेवून यशस्वी झालेल्या ममता

ममता बॅनर्जी, (Mamata Banarjee) सध्याच्या पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री. २०११ साली बलाढ्य आणि अनेक वर्षांपासून बंगालच्या मातीत पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या डाव्यांना खाली खेचत त्या या पदापर्यंत येवून पोहचल्या होत्या. मला या गोष्टीच मुळीच आश्चर्य वाटत नाही. कारण ही बाई अशीच आहे. पहिल्यापासूनच अतिमहत्वकांक्षी. पहिल्यापासूनच बड्या लोकांशी वाकडं घेण्याची सवय. आपल्या राजकारणाच्या प्रवेशावेळी मोरारजी देसाई (Morarji Desai), जयप्रकाश नारायण (Jaiprakash Narayan) यांच्याशी वाकडं घेतलं. थेट त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून, प्रसंगी गाडीवर चढून डान्स केला होता. नंतरच्या काळात थेट सोनिया गांधीशी (Sonia Gandhi) वाकडं घेत कॉंग्रेस सोडली आणि स्वतःची तृणमूल कॉंग्रेस (TMC) स्थापन केली. आज तो निर्णय किती योग्य होता हे कॉंग्रेसमधील त्यावेळी त्यांच्यावर हसलेलेच नेते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील. हेच नेते आज सो कॉल्ड G-23 चा भाग आहेत. ममता बॅनर्जी तशा डोक्याने पण सनकी एकदम. लगेचच तळपायाची आग मस्तकात जाते. फाडफाड बोलून मोकळ्या होतात.

एकदा अटलजी (Atal Bihari Vajpeyee) पंतप्रधान असताना त्यांनी थेट पंतप्रधानांच्या टेबलावर त्यांच्या पक्षाच्या एका मृत कार्यकर्त्याची खरीखुरी कवटी आणि हाडं नेवून ठेवली होती, आणि याला मारणाऱ्याला अटक करण्याची मागणी केली होती. अजून एकदा अशाच चिडून आणि रुसुन त्या बंगालला निघून गेल्या. त्यावेळी त्यांना समजवायला खुद्द अटलजींना यावं लागलं होतं.

ममतांचा स्वभाव कधी कधी त्यांच्या नावाच्या विरुद्ध वाटतो, पण त्या जशा चिडखोर तशाच प्रेमळ देखील. त्यांचा शांत आणि संयतपणा अनुभवायचा असेल तर कधीतरी बंगालच्या रॉयटर्स बिल्डिंगची चक्कर मारा. त्यांचा बंगाली रसगुल्ल्यांचा पाहुणचार अनेकांनी अनुभवला आहे. रॉयटर्स वरुन आठवलं, एकदा ज्योती बसू (Jyoti Basu) मुख्यमंत्री असताना ममतांनी एक आंदोलन केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही. उलटं त्यावेळी हे आंदोलन मोडित काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याच झटापटीत त्यांचे कपडे फाटले. मग काय त्यांनी शपथ घेतली अन् म्हणाल्या, आता इथे परत येईन ते मुख्यमंत्री होवूनच! २०११ ला त्यांनी ही शपथ पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी २००७ मध्ये शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फायदा घेतला. पण प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं या तत्वाने त्यांना ते योग्य वाटलं असावं, आणि त्यावेळी डाव्यांविरोधात पुकारलेलं ते युद्धचं होतं.

हेही वाचा: आपल्याकडे पुलांची एक्स्पायरी डेटच नाही, त्यामुळे अपघात - गडकरी

ममतांचा अतिमहत्वकांक्षीपणा अगदी नियोजनबद्ध असतो असं मला वाटतं. कारण त्या एका टप्प्यावर जास्त वेळ कधीच रमत नाहीत. सतत पुढे प्रवाहत जातात. १०-१० वर्षांच्या टप्प्याने. कारण कॉंग्रेसमध्ये असताना त्या १९८४ ला पहिल्यांदा खासदार झाल्या. पुढे कॉंग्रेसमध्येच १९९२-१९९३ काळात केंद्रात एकवेळ राज्यमंत्री झाल्या होत्या. पुढे तृणमूलमधून २००२ नंतर अटलजींच्या आणि मनमोहनसिंगाच्या काळात त्या कॅबिनेट मंत्री झाल्या. पुढे १० वर्षात २०११ साली त्या बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या आणि आता २०२१ च्या दशकात त्या पंतप्रधान होण्यासाठी धडपडत आहेत. हा पॅटर्न मला चिनी लोकांसारखा वाटतो. एकदा चालायच ठरवलं की चालत राहयचं. अंतराचं मोजमाप करायचं नाही. वेळेच गणित आणि टप्पा डोक्यात ठोकायचा आणि प्रवास सुरु करायचा.

ममता आता राजकारणाच्या निर्णायक टप्प्यावर आहेत. अशा काळात त्या थेट मोदी-शहांशी वाकडं घेतयात. कितपत यशस्वी होतील याचा अंदाज नाही पण दोन बलाढ्य हत्तींपुढे एकटं उभं राहण्याचं धाडसं दाखवतायत. हे ही नसे थोडके. पण आधी कॉंग्रेस नंतर डाव्यांच्या आणि आता भाजपच्या नेतृत्वांशी वाकडं घेणारी वाघिण म्हणून त्या नक्कीच कायम ओळखल्या जातील हे नक्की.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top