...म्हणून गंगारामला प्रथम फासावर लटकावतात

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

एखाद्या आरोपीला फाशी कशी दिली जाते, फाशीवेळी कोण-कोण उपस्थित असते. फाशीची प्रक्रिया कशी असते, याबाबत अनेकांच्या मनात कुतुहूल असते. फाशीची प्रक्रिया नियमानुसार असून, आरोपीला फाशी देण्यापूर्वी प्रथम गंगारामला फासावर लटकावले जाते.

नवी दिल्लीः एखाद्या आरोपीला फाशी कशी दिली जाते, फाशीवेळी कोण-कोण उपस्थित असते. फाशीची प्रक्रिया कशी असते, याबाबत अनेकांच्या मनात कुतुहूल असते. फाशीची प्रक्रिया नियमानुसार असून, आरोपीला फाशी देण्यापूर्वी प्रथम गंगारामला फासावर लटकावले जाते. गंगाराम म्हणजे कोण? असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. गंगाराम व फाशीची प्रक्रिया जाणून घेऊयात.

जल्लाद फाशी देण्यापूर्वी कैद्याच्या कानात म्हणतो की...

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना 22 जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार आहे. याची रंगीत तालीम तिहार कारागृहात रविवारी (ता. 12) घेण्यात आली. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याचिका, फेरयाचिका, दयेचा अर्ज असे करत आता निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना फासावर लटकावले जाणार आहे. एकाच वेळी चौघांना फासावर लटकवण्याची वेळ बऱ्याच वर्षांनी आली आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित आरोपीला फाशी दिली जाते. मात्र, आरोपीला फाशी देण्याच्या आधी गंगाराम नावाच्या पुतळ्याला फासावर लटकवले जाते. त्यानंतर संबंधित आरोपीला फाशी दिली जाते. गंगाराम पुतळ्याची निर्मिती का आणि कुणी केली याची माहिती उपलब्ध नाही. पण, फाशी देण्याचा आधी प्रत्येक तुरुंगात गंगारामला फाशी देण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे. आरोपीला फाशी देण्यापूर्वी फाशीचे प्रत्याक्षीक घेतले जाते. त्याचाच एक भाग म्हणून पहिले गंगारामला मारले जातं. फाशी दिल्या जाणाऱ्या प्रत्येक तुरुंगात गंगारामचा पुतळा तयार करण्यात येतो. ज्या व्यक्तीला फाशी द्यायची आहे. त्या व्यक्तीच्या वजनाच्या दीडपट जास्त वजन असलेला पुतळा तयार केला जातो. फाशी देणारी दोरी तपासली जाते. प्रत्यक्ष फाशी देण्यापूर्वी डमी फाशीला दिली जाते. डमी फाशी यशस्वी झाल्यानंतरच संबंधीत आरोपीला फासावर लटकवले जाते.

डमी फाशी देणाऱ्या पुतळ्याचे नाव गंगारामच का ठेवले याबद्दलची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करताना केवळ 5 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असते. यामध्ये तुरुंग अधिक्षक, तुरुंगातील उपआधिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी, न्यायाधीश, या शिवाय फासीची शिक्षा झालेल्या व्यक्तीची इच्छा असेल तर त्याच्या धर्मातील कोणताही व्यक्ती उपस्थित राहू शकते.

निर्भयातील दोषींनो तुम्ही लटकणारच; वेळ अन् तारिखही ठरली

दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना 22 जानेवारीला सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार आहे. याची रंगीत तालमीसाठी अधिकाऱ्यांनी दोषींचे वजन घेऊन त्यानुसार बनावट प्रतिकृती तयार केली. त्यासाठी दगड आणि अवशेषाने भरलेल्या पोत्यांचा वापर करण्यात आला. कारागृह क्र. 3 मध्ये फाशीची रंगीत तालीम अधिकाऱ्यांच्या पथकाने घेतली. फाशीसाठी वापरण्यात येणारे दोर एवढे वजन पेलवू शकतात का, चौघांना फाशी देण्यासाठी किती वेळ लागतो आणि फाशीच्या चारही ठिकाणी काही तांत्रिक त्रुटी राहिली नाही व याची खात्री करून घेण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्याचे समाधान तुरुंगाचे अधिकऱ्यांना वाटत आहे. वेळेचे नियोजन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यासाठी फाशी देण्यासाठी लागणारा वेळ थोडा कमी करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

चारही दोषींना फाशी देण्यासाठी मेरठहून पवन जल्लादची रवानगी तिहारला करण्यात आले असल्याच्या वृत्ताला उत्तर प्रदेश कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे. "निर्भया'प्रकरणात मुकेश (वय 32), पवन गुप्ता (वय 25), विनय शर्मा (वय 26) आणि अक्षय कुमारसिंह (वय 31) यांना फासावर चढविण्यासाठी दोन जल्लादांची गरज असल्याचे तिहार प्रशासनाने उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासनाला लेखी कळविले आहे. चारही आरोपींना एकाच वेळी फाशी देण्याची शक्‍यता आहे. त्यांची मानसिक स्थिती चांगली आहे का, हे पाहण्यासाठी तुरंग अधिकारी चौघांशी दररोज संवाद साधतात.

आर्थिक मंदीचा फटका, 'इतक्या' लाख नोकऱ्या झाल्यात कमी..

फाशीचे दोर सुरक्षित
चारही दोषींना फासावर लटकवण्यासाठी जे दोर तयार करण्यात आले आहेत, त्यांना लोणी लावून सुरक्षित ठेवले आहे. लोण्यामुळे दोर मऊ राहतो. या दोरांचे काही नुकसान होऊ नये आणि उंदरांपासून त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी ते योग्य सुरक्षा यंत्रणेसह लॉकरमध्ये ठेवण्यात आले आहेत.

उच्चस्तरीय सुरक्षा
दोषी भुयार खोदून पळून जाऊ नयेत, यासाठी तुरुंग क्र.3 मध्ये चार नव्या बराकी तयार केल्या जात आहेत. या बराकी फाशीच्या जागेजवळील उच्चस्तरीय सुरक्षा वॉर्डात आहेत. या वॉर्डात पूर्वी संसदेवरील हल्ल्यातील दहशतवादी दोषी अफजल गुरूला ठेवण्यात आले होते. ज्याला जेथे ठेवले होते, तेथे "निर्भया'च्या चारपैकी एका दोषीला ठेवण्याची शक्‍यता आहे. दोषींनी भुयार खोदू नये, फाशीच्या शिक्षेपूर्वीच आत्महत्या करू नये आणि तुरुंगातील अन्य कैदी किंवा कर्मचाऱ्यांपैकी कोणी त्यांच्यावर हल्ला करू नये, याची संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. फाशीच्या शिक्षेच्या तयारीचा आढावा अधिकाऱ्यांनी काल घेतला. तुरुंग क्र.3 मधील तुटलेल्या फरशांची दुरुस्ती करण्यात येत असून, सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why gangaram was killed before being sentenced to death