'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' का होतोय साजरा; राहुल गांधींनी दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' का होतोय साजरा; राहुल गांधींनी दिलं उत्तर

'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' का होतोय साजरा; राहुल गांधींनी दिलं उत्तर

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७१ वा वाढदिवस आहे. देशासह जगभरातून त्यांच्या या वाढदिवसानिमीत्त त्यांना शुभेच्छा दिल्या जाता आहेत. मात्र एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव सुरु असतानाच # राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हा हॅश टॅग देखील ट्रेंडींगमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही वर्षांपासून भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना, कोरोना संकटामुळे त्यात आणखी भर पडली. या सर्व परिस्थितीमध्ये देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या मुद्दयावरून देशभरातून नरेंद्र मोदींवर टीका होते आहे. त्यातच आज नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत टीका करताना #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ सालच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा देखील उल्लेख या टीकांमध्ये होताना दिसतोय.

हेही वाचा: दिल्ली: CBI कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की, #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस साजरा करण्याची गरजच भासली नसती जर भाजपने आपल्या मित्रांसाठी नव्हे तर जनतेसाठी काम केलं असतं.

हेही वाचा: मोदींच्या वाढदिनी लसीकरणाचा विक्रम! भारतात दिवसभरात दिले जाणार दोन कोटी डोस

नेटकऱ्यांनी आज देशातील बेरोजगारीचा दर सांगणाऱ्या बातम्यांची कात्रण, बेरोजगारीशी संबंधीत आंदोलनांचे फोटो, व्हीडिओ आणि व्यंगचित्र #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस आणि #National_unemployment_day हे हॅशटॅग वापरुन सोशल मीडियावर शेअर केले आहेत. काँग्रेस, विरोधीपक्ष आणि नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी हा हॅशटॅग वापरत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये 8.3 टक्के असलेली शहरीभागातील बेरोजगारी ऑगस्टमध्ये 9.78 टक्क्यांवर पोहोचली आहे. कोविड -१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा देशाला फटका बसण्यापूर्वी मार्चमध्ये शहरी बेरोजगारीचा दर 7.27 टक्के होता. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, खरीप हंगामात कमी पेरणी झाल्यामुळे ऑगस्टमध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीमध्ये वाढ झाली असून, जुलैमध्ये 6.34 टक्के असलेला बेरोजगारीचा दर 7.64 टक्क्यांवर पोहोचला आहे.