World Food Day:अन्न टाकण्यापूर्वी विचार करा; आपण कोणाचं तरी पोट भरू शकतो!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

भारतात दरवर्षी 67 दशलक्ष टन इतके अन्न वाया घालवले जाते ज्याची किंमत जवळपास 92 हजार कोटींच्या आसपास होते

नवी दिल्ली : आज World Food Day म्हणजेच जागतिक अन्न दिवस आहे. 16 ऑक्टोबर रोजी असा काही दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो, हे काहीजणांना माहितीही नसेल. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवर युनायटेड नेशन्सद्वारे 1945 साली फूड अँड एग्रिकल्चर ऑर्गनायझेशनची स्थापना केली गेली ज्यामुळे हा दिवस आज साजरा केला  जातो. आपण 21 व्या शतकातील आधुनिक मानव आहोत मात्र अद्यापही जगात माणसाच्याच भूकेची समस्या मिटलेली नाहीये. वरकरणी शुल्लक वाटणारी अन्नाची नासाडी ही गंभीर समस्या आहे.

काही विशेष गोष्टी साजऱ्या करण्यासाठी म्हणून कार्यक्रमात, लग्नसमारंभात, पार्टीमध्ये आपण चमचमजीत जेवणाचा थाट मांडतो. मात्र तुम्ही कधी विचार केलाय की किती मोठ्या प्रमाणावर आपण अन्न वाया घालवतो. आपल्या घरात, गल्लीत, शहरात, देशात आणि मग एकूण जगात आपण किती अन्न वाया घालतो याचा कधीतरी जरा शांतपणे विचार करायला हवा. अन्न वाया घालवताना आपल्या चेहऱ्यासमोर अशा व्यक्तीचा चेहरा जरुर यायला हवा ज्याला एक वेळचे जेवण देखील मिळत नाही.

हेही वाचा - Bihar Election : 'ही तर माझ्याच गाण्याची नक्कल'; भाजपाच्या प्रचारगीतावर अनुभव सिन्हांचा आक्षेप

भारतात होते भरपूर नासाडी
अन्न हे पूर्णब्रह्म आहे आणि आम्ही अन्न वाया घालवत नाही असा भारतीयांचा दावा असतो, मात्र ते खरं नाहीये. डेटा असं सांगतो की ब्रिटन जितके अन्न खातो तितके अन्न भारतात वाया घालवले जाते. खरं तर, खाद्यपदार्थाचा अपव्यय हा एक चिंताजनक मुद्दा आहे आणि देशातील रस्त्यावर, कचराकुंड्यांमधील कचऱ्यामध्ये दिसणारी अन्नाची नासाडी हे सिद्ध करण्यास पुरेशी आहे. युनायटेड नेशन्सच्या डेव्हलपमेंट प्रोग्रामने दिलेल्या माहितीनुसार, भारतात तयार झालेल्या अन्नापैकी तब्बल 40 टक्के अन्न हे उपयोगात न पडता वाया जाते तर वर्षाकाठी 21 दशलक्ष टन गहू वाया जातो.

लॉकडाऊनच्या काळात अतोनात नुकसान
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न वाया गेल्याची माहिती आहे. सप्लाय चेनच बिघडल्यामुळे हा कहर झाल्याचं दिसून येतय. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर कुठेही जाण्यास मज्जाव केल्यामुळे मिल्कबास्केट नावाच्या फूड डिलीव्हरी वेबसाईटच्या 15 हजार लिटर दूधाचे आणि 10 हजार किलोच्या फळभाज्यांचे एका दिवसांत नुकसान झाले. लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाच लॉकडाऊनमुळे कोलमडल्यामुळे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो लिटर दुध नदीत ओतले होते. या आणि अशा काही उदाहरणांवरुनच तुम्हाला कल्पना येईल की लॉकडाऊन दरम्यान किती मोठ्या प्रमाणावर भारतात अन्नाची नासाडी झालीय. 

हेही वाचा - सुंदर, अप्रतिम! कोरोना संकटातून लवकरच बाहेर पडू असं सांगणारा हा फोटो

भारतात होते इतकी नासाडी
भारतात दरवर्षी 67 दशलक्ष टन इतके अन्न वाया घालवले जाते ज्याची किंमत जवळपास 92 हजार कोटींच्या आसपास होते आणि ही रक्कम अख्ख्या बिहारचे पोट भरण्यास पुरेशी आहे. जवळपास 21 दशलक्ष मेट्रीक टन इतका गहू दरवर्षी भारतात सडतो. हे खुप दुखद आहे की दरवर्षी ऑस्ट्रेलियात पिकणाऱ्या गव्हाइतकी भारतात सडणाऱ्या गव्हाची आकडेवारी आहे. बृहन्मुंबई मुन्सिपल कोर्पोरेशनच्या 2018 च्या आकडेवारीनुसार, मुंबई दररोज 9400 मेट्रीक टन इतका कचरा निर्माण करते ज्यातील 73 टक्के कचरा हा फक्त भाज्या, फळे आणि अन्न यांचा कचरा असतो तर तीन टक्के प्लास्टिक कचरा असतो. 

जगभरात होते इतके नुकसान
अन्नाच्या नासाडीमुळे केवळ पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो असं नाहीये तर, त्याचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत गंभीर असा परिणाम होतो. FAO ने दिलेल्या अहवालानुसार, मानवासाठी निर्माण केलेल्या अन्नापैकी एकतृतीयांश इतके अन्न वाया घालवले जाते. आणि याचे जर आपण पैशात मूल्यमापन केलं तर जवळपास दरवर्षी 1 ट्रिलीयन डॉलर इतके मूल्य असणाऱ्या अन्नाची नासाडी होते. या नासाडी झालेल्या अन्नाचे आर्थिक मूल्य 1 ट्रिलीयन डॉलर असलं तरीही त्याचे पर्यारणीय मूल्य हे 700 अब्ज डॉलर तर सामाजिक मूल्य 900 अब्ज डॉलर इतके होते. 

हेही वाचा - USमधील बेरोजगारीचं खापर 'बायडेन'माथी, बायडेन जिंकले तर समजा चीन जिंकला

आपण काय करु शकतो?
यावर सरकारने काहीतरी ठोस करावी ही अपेक्षा रास्त आहेच मात्र आपणही वैयक्तीक पातळीवर नक्कीच महत्वाची भूमिका बजावू शकतो. जितकं गरजेचं आहे तितकंच अन्नापदार्थाचे साहित्य खरेदी करा. कारण डेटा असं सांगतो भारतातील शहरी भागात खरेदी केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थापैकी 20 टक्के अन्न हे वाया घालवले जाते. गरज नसलेल्या वस्तू खरेदीच न करता आपण मोठ्या प्रमाणावर होणारी नासधुस नक्कीच थांबवू शकतो.  जितकं अन्न लागणारे तितकंच दररोज शिजवलं जातंय का कि उगाच त्याहून अधिक शिजवून नंतर ते टाकूनच दिलं जातंय हे पहायला  हवं. असं जर दररोज  होत असेल तर हे टाळण्यासाठी याचंही नीटसं नियोजन करायला हवं. फळभाज्या आणि नाशवंत पदार्थ आधी वापरुन उपयोगात आणा जेणेकरुन ते असेच वाया जाणार नाही. हवाबंद डब्यातील पदार्थ, पॅक केलेले पदार्थ त्यांची एक्स्पायरी डेट संपायच्या आधीच वापरा. जर तुम्ही कुठेही बाहेर कॅन्टीनमध्ये, हॉटेलमध्ये अथवा संमारंभात वगैरे जेवत असाल तर लागतं तितकंच अन्न घ्या... मान्यय की चमचमीत पदार्थांना पाहून जीभेच्या सुचनांनी हातांवरचा आपला ताबा सुटतो आणि आपण भरमसाठ अन्न आपल्या ताटात घेतो. की जे आपल्याला नंतर जास्त होतं. हे अन्न आपण नंतर टाकूनच देतो... पण असं होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायला हवी...

कृषीवल कृषीकर्मी राबती दिनरात्र... 
श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात...
स्मरण करुन त्यांचे अन्न सेवा खुशाल...
उदरभरण व्हावे चित्त होण्या विशाल...

त्यामुळे... शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा कष्टाचा सन्मान करायचा असेल आणि त्याच्या नवनिर्मितीचा अनादर करायचा नसेल तर आपल्याला अन्न वाया घालवून चालणार नाही. ताटातील अन्न टाकून देताना किमान एकदा तरी भुकेने काळवंडलेल्या मुलाचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर नक्की आणूयात....
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world food day 2020 how waste of food affects socio economic sector in india