बालक-पालक : छडी लागे छमछम...

अभिजित पेंढारकर
Wednesday, 13 January 2021

आई आता बाबांचा समाचार घ्यायला गेल्याचं बाहेरही स्पष्ट ऐकू आलं.नेमकं तेवढ्यात पिट्टूला शाळेतल्या टीचरनी काहीतरी प्रश्न विचारला होता आणि घरात एवढा आवाज असल्यामुळे त्याला उत्तर येत असूनही देता येत नव्हतं

हिवाळ्यातल्या थंड दिवसातली पहाट नेहमीप्रमाणे कुडकुडत उगवली होती. शहरातले रस्ते धुक्याची दुलई पांघरून पहुडले होते. खिडक्यांच्या काचांवर दवबिंदू साचले होते. हॉलमध्ये अंथरलेल्या चटईवर एक गोधडी पांघरली होती. त्यावर एक छोटा देह दुलईत लपेटून सुखाची निद्रा घेत होता. 

तेवढ्यात किचनमधून हाक आली, ‘‘पिट्टू...! झोपलास की काय पुन्हा? ऊठ...ऊठ बघू...! शाळा अटेंड कर...! व्हिडिओ बंद करून झोपतोस काय गधड्या!’’ 

‘‘हो हो...करतो!’’ दुलईत गुरफटून गेलेल्या त्या देहानं किंचित चुळबूळ केली. एक बोट दुलईच्या बाहेर आलं. लॅपटॉपपर्यंत पोहोचायच्या आधी थबकलं. हात खाली टेकला गेला आणि पुन्हा सगळी चुळबूळ शांत झाली. श्वासाबरोबर दुलई वरखाली होण्याची हालचाल तेवढी सुरू राहिली. 

बालक-पालक : सुरणाय स्वाहा!

‘‘पिट्टू...!!!’’ यावेळची हाक मात्र आणखी जोरात आली होती. पिट्टू खडबडून जागा झाला आणि ताडकन उठून बसला. 

‘‘कितीदा सांगितलंय तुला, अंथरूण-पांघरूण घेऊन लोळत शाळा अटेंड करू नकोस. झोप लागते तुला!’’ आईनं दम दिला, तसा पिट्टू निमूटपणे शाळेत लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागला. 

‘‘जरा तो मोबाईल बाजूला ठेवून मुलाकडे बघता का?’’ आई आता बाबांचा समाचार घ्यायला गेल्याचं बाहेरही स्पष्ट ऐकू आलं. नेमकं तेवढ्यात पिट्टूला शाळेतल्या टीचरनी काहीतरी प्रश्न विचारला होता आणि घरात एवढा आवाज असल्यामुळे त्याला उत्तर येत असूनही देता येत नव्हतं. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘प्रत्यक्ष शाळा कधी एकदा सुरू होतेय, असं झालंय. हा पिट्टू रोज वर्ग चालू असताना झोपतो. तुमच्या लाडानं बिघडलाय तो!’’ आईचा आवाज अजूनही घुमत होता. 

‘‘गेल्या वर्षीही तो शाळेत झोपत असल्याच्या तक्रारी येतच होत्या की. आणि मी काय लाड करतो? त्याला ‘कंफर्टेबल’ वाटावं, म्हणून गोधडी, दुलई कोण आणून देतं त्याला? तूच ना?’’ 

झालं! विषय वेगळाच होता आणि गाडी भलत्याच मार्गाला लागली. 

पिट्टूची शाळा संपली आणि मग दोघांनीही त्याला फैलावर घेतलं. 

‘‘ह्याची शाळेतून नक्की तक्रार येणार आहे बघा!’’ पिट्टूची आई म्हणाली. तेवढ्यात तिच्या फोनचा मेसेज टोन वाजला. 

‘‘हे बघा, टीचरनी उद्या शाळेत भेटायला बोलावलंय आपल्याला!’’ मेसेज वाचून आई म्हणाली. 

आता बाबांच्या चेहऱ्यावरही चिंता पसरली. 

‘‘अगं, काहीतरी वेगळा विषय असेल.’’ 

‘‘मग टीचरनी कशासाठी बोलावलं असतं? उद्या भरपूर ऐकून घ्यायला लागणार ह्याच्यावरून. काय काय होतंय, कोण जाणे!’’ असं म्हणत आईची चिडचिड सुरू राहिली. 

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता आईबाबा दोघंही टीचरसमोर हजर झाले. 

‘‘आमचा पिट्टू तसा हुशार आहे, अभ्यासही करतो, पण ऑनलाइन शाळेमुळे जरा...’’ टीचर काही बोलायच्या आधीच, वातावरण शांत राहावं, म्हणून आईनं थोडी प्रस्तावना केली. 

‘‘मुलं ऑनलाइन शाळेला कंटाळली आहेतच. आम्ही समजू शकतो. त्याला थोडं समजावलं, तरी तो ऐकेल.’’ टीचरनी आश्वासक स्वरात सांगितलं आणि आई-बाबांचा जीव भांड्यात पडला. 

मग पुन्हा एक दीर्घ श्वास घेऊन टीचर म्हणाल्या, ‘‘माफ करा, पण तुमचा दोघांचा आवाजच जास्त येत असतो नेहमी. पालकांनी मुलांसमोर भांडणं बरं नाही. मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. तेवढं टाळता आलं तर बघा, एवढंच सांगायला तुम्हाला इथं बोलावलं होतं...’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: abhijit pendharkar write article student & teacher

Tags
टॉपिकस
Topic Tags: