मार्कांपेक्षा आयुष्य मोठं! केमिस्ट्रीला 24 गुण मिळालेल्या IAS अधिकाऱ्याचं मार्कलिस्ट पाहा

सूरज यादव
Saturday, 25 July 2020

गुणांच्या ओझ्याखाली मुलांना दाबून टाकू नका. आय़ुष्य हे बोर्डात मिळणाऱ्या गुणांपेक्षा खूप मोठं आहे असं  आयएएस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

नवी दिल्ली - भारतात नुकताच सीबीएसईचा निकाल लागला. 10 वी आणि 12 वी चे निकाल लागल्यानंतर पैकीच्या पैकी गुण मिळालेले काही विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांचे एका बाजुला कौतुक होत असताना काही असेही आहेत ज्यांना अपयश आलं आहे. अशा विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्याने गुण म्हणजे सगळं काही नव्हे असा संदेश दिला आहे. यासाठी त्यांनी स्वत:ची गुणपत्रिकाही सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या त्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. 

जास्त गुण पडलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक होतं आणि ज्यांना कमी गुण पडलेत त्यांना लोक काय म्हणतील असे प्रश्न सतावत असतात. दरम्यान, गुणांच्या दबावाखाली विद्यार्थी वावरत असतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. नितिन सांगवान नावाच्या आयएएस अधिकाऱ्याने स्वत:च्या गुणपत्रिकेचा फोटो शेअर करून अशा विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका असं सांगितलं आहे. 

हे वाचा - चंबळमधलं गुंडाराज संपवणाऱ्या IPS अधिकाऱ्याने केलं विकास दुबेच्या एन्काउंटरचं नेतृत्व

नितिन सांगवान असं आयएएस अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी 2002 मध्ये 12 वीची परीक्षा दिली होती. तेव्हाच्या गुणपत्रिकेचा फोटो शेअर करताना नितिन सांगवान यांनी म्हटलं की, मला 12 ला रसायनशास्त्रात 24 गुण मिळाले होते. पास होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा फक्त एक मार्क जास्त मिळाला होता.  मात्र त्या गुणांनी मला आयुष्यात काय करायचं आहे हे ठरवलं नाही. गुणांच्या ओझ्याखाली मुलांना दाबून टाकू नका. आय़ुष्य हे बोर्डात मिळणाऱ्या गुणांपेक्षा खूप मोठं आहे. निकाल हा आत्मपरीक्षणासाठी बघावा कोणावर टीका किंवा त्याची निंदा कऱण्यासाठी नको. 

हरियाणातील चर्खी दादरी इथं राहणाऱ्या नितीन सांगवान यांनी त्यांच्या 12 वीच्या निकालाचा दबाव घेतला नाही. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील नितिन यांना इंजिनिअर व्हायचं होतं. सीबीएसईतून शिक्षण घेतलेले नितिन कसेबसे पास झाले होते. त्यानंतर पुढचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. इन्फोसिसमध्ये नोकरी करत असतानाच 2014 मध्ये युपीएससीची परीक्षा दिली. तेव्हा ते आयआरएस झाले मात्र एवढ्यावर ते समाधानी नव्हते. पुन्हा 2015 मध्ये युपीएससी परीक्षा देऊन आयएएस झाले. आपल्या 12 वीच्या निकालाने त्यांनी आत्मविश्वास कमी होऊ न देता जोमाने अभ्यास करत कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाला गवसणी घातली. 

हे वाचा - वडिलांच्या हत्येनंतर 22 लाखांची नोकरी सोडून बनला IPS; पोलिस दलातील सुपरहिरोची कहाणी

सांगवान यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयआयटी मद्रासमधून नितिन यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर इन्फोसिसमध्ये शिकत असतानाच सिव्हील सर्व्हिसेसची तयारी सुरु केली. 2015 मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षेत 28 वी रँक मिळवली. सध्या ते अहमदाबाद नगर निगममध्ये उपायुक्त म्हणून काम करतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IAS nitin sangwan share his 12th marklist which shows 24 marks in chemistry