नोकरी गेली काय करायचे? कसे सामोरे जाल या प्रसंगाला

Keep the positivity in mind even if the job is gone
Keep the positivity in mind even if the job is gone

नागपूर : सध्या कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्र मंदावले आहे. अनलाॅकनंतर हळूहळू गाडी रुळावर येत असली तरी संपूर्ण सुरळीत होण्यासाठी अजून बराच अवकाश आहे. आर्थिक गती मंदावल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या. हजारो लोकांची नोकरी गेली. ऐन आर्थिक अडचणीत रोजगार गेल्याने अनेकांची मानसिक अवस्था खराब झाली. परंतु असे करून कसे चालेल. आलेल्या प्रसंगांना सामोरे जाणे गरजेचे आहे.

हातची नोकरी जाणे, ही खूप मोठी आपत्ती आणि सर्वांत वाईट गोष्ट आहे. अशावेळी नेमके काय करायचे? हे माहिती नसते. कशी करायची त्यावर मात, त्यासाठी आधीपासूनच काय काय तयारी ठेवायची आणि कशी शोधायची नवीन संधी, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हातची नोकरी जाण्यापूर्वी इमर्जन्सी फंडाची तजवीज करून ठेवणे गरजेचे आहे. नोकरी जाण्याचा प्रसंग अनेकांवर कधी ना कधी आला असेल. अशा वेळी घरातील खर्च आणि बचत यांचे गणित कोलमडते. त्यावेळी मानसिकता चांगली रहात नाही. आपण नवीन नोकरी शोधण्याच्या मागे लागतो. कधी आपल्या मनासारखी नोकरी मिळत नाही.

सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात अनेक कंपन्यांनी कामगारांना कामावरून कमी केले. सध्याची देशाची आर्थिक स्थिती फारशी बरी नाही. अनेक कारणांनी सॉफ्टवेअर कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काही कंपन्यांनी कामगार कमी केले आहेत. याशिवाय अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनीही नोकर कपातीचे धोरण स्वीकारले. जर नोकरी गेली तर मुलांच्या शाळेची फी, घरातील खर्च, बँकेचा हफ्ता, बचत, आजारपण, घराचे भाडे अशा खर्चाचा डोंगर डोळ्यांसमोर येतो. आपण नवीन नोकरी शोधायला जातो तेव्हा आपल्याला आधीच्या पटीत पगार मिळेलच असे नाही. तसे पदही मिळेल हे खात्रीने सांगता येणार नाही. मग अशावेळी नवीन नोकरी मिळेपर्यंत तुमच्याकडे पुढील सहा महिने तुमचे सर्व खर्च भागू शकतील इतकी बचत असली पाहिजे.

आयुष्यात येणाऱ्या आर्थिक संकटाच्या आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आपण केली पाहिजे. नोकरी गेली तर? निदान पुढील पाच-सहा महिने पुरेल एवढा आर्थिक साठा असणे गरजेचे आहे. त्यामध्ये घरभाडे किंवा स्वतःचं घर असेल तर इएमआय, मुलांची फी, घरातील इतर खर्च तुम्ही भागवू शकाल. नवीन नोकरी लागेपर्यंत तुम्हाला त्यातून आर्थिक आधार मिळेल. जर तुमच्याकडे जमा पैसे कमी असतील तर तुम्ही जरा जास्त पगारची नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. पण, ती लागेपर्यंत तुमचा खूप वेळ जाईल. तुम्ही साठवलेले पैसे खर्च होत राहतील आणि त्यात नवीन भर पडणार नाही. तुमची बचत जर जास्त असेल तर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात कमी पगारची नोकरी लगेच स्वीकारू शकता. बचतीचा आणखी एक फंडा म्हणजे गुंतवणूक. तुम्ही सोने, मासिक भिसी किंवा इतर तत्सम ठिकाणी पैसे गुंतवू शकता.

उत्पन्नाचे स्रोत वाढवणे हाही एक पर्याय आहे. अनेक लोक गुंतवणूक म्हणून जमीन किंवा शेती खरेदी करतात आणि त्याची दुप्पट दराने विक्री करून पैसे मिळवतात. गुंतवणूक, बचत आणि खर्च यांचा मेळ साधा. आणि त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य ठिकाणी पैसे गुंतवा. बचतीपेक्षा खर्चावर नियंत्रण ठेवा. अनेक लोकांना आपल्या बचतीपेक्षा खर्च जास्त करण्याची हौस किंवा सवय असते. अशा लोकांची हौस हातात पैसा आला नाही तर कमी होते. त्याचा परिणाम त्यांच्या वर्तणुकीवर होतो.

सकारात्मकता अंगी असणे गरजेचे

तुमच्या खर्चाचे प्रमाण आटोक्यात असावे. साधारणतः तुमच्या खर्चाचे प्रमाण तुमच्या पगाराच्या 6० टक्क्यांपेक्षा जास्त नको. यातून दोन फायदे होतात. एक म्हणजे तुमची बचत खूप होते आणि वायफळ पैसा खर्च होत नाही. महिन्याला तुमची बचत किती व्हावी, याचे नियोजन करा. पगाराच्या 40 टक्के रक्कम खर्च होत असेल तर 60 टक्के रक्कम बचत झाली पाहिजे. योग्य बचत करण्याची सवय लावून घ्या. याशिवाय सकारात्मक राहणे गरजेचे आहे. कारण सकारात्मकतेने तुम्ही अनेक प्रश्नांचे उत्तर शोधू शकता. प्रत्येकवेळी डोके शांत ठेवून विचार करणे गरजेचे आहे.

सर्वांशी सलोखा सर्वांत महत्वाचा

तुम्ही काम करत असताना अनेक सहकार्‍यांशी तुमचा संबंध येतो. काहींशी पटते तर काहींशी नाही. जर तुम्ही टीमचे लीडर आहात तर तुम्ही सर्वांना एकत्रितपणे प्रोत्साहित करून त्यांच्याकडून कशी कामे करून घेता? यावरही तुमच्या नोकरीचे भवितव्य अवलंबून आहे. ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्यासोबत तुम्ही वाईट वर्तन करता का? त्यांना सतत नावे ठेवता का? भांडता का? जर तसे असेल तर तुम्ही लवकरच बाहेर फेकले जाऊ शकता. त्यामुळे सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवा.


एकदा केलेली चूक पुन्हा करू नका

तुम्ही नुसते गाढवासारखे ओझी वाहण्याचे काम करताय का? संस्थेच्या प्रगतीसाठी, ग्राहकांसाठी नवीन कल्पना सुचवत नाही का? त्यासाठी पुढाकार घेत नसाल तर, संस्थेच्या प्रगतीसाठी तुमचा काही उपयोग नाही, असे समजून संस्था तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेल. तर तुम्ही सतत जर तुमच्या कामात अपयशी होत असाल, दिलेले काम वेळेत पूर्ण करत नसाल तर तुम्हाला कंपनी काम करण्याची अधिक संधी देऊ शकत नाही. तुमच्या कामाचा फायदा कंपनीला होत नसेल, तुमच्या कामात सारख्या चुका होत असतील तर ती संस्था तुम्हाला कामावरून काढून टाकेल. त्यामुळे कामातील चुका कमी करा, त्या सुधारण्याचा प्रयत्न करा.

संकलन/संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com