वाटा करिअरच्या : दहावीनंतर पुढे काय?   

प्रमोद चौधरी
Saturday, 21 March 2020

साधारणपणे दहावीचे निकाल लागले की आता पुढे काय? असा प्रश्न प्रत्येक पालकांना सतावत असतो. कारण करिअरच्या मैदानात पाल्याचे पहिल्यांदाच पाऊल पडणार असते. परंतु, काळजी करू नका...दहावीनंतर कला, शास्त्र अन् वाणिज्य या मुख्य फॅकल्टीशिवाय चाकोरीबाहेरचेही अनेक अभ्यासक्रम असतात. 

नांदेड : शालेय जिवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा. त्यामुळे आठवीपासूनच पालक आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देवून असतात. दहावीमध्ये पाल्य गेल्यावर अधिकचेच लक्ष दिले जाते. लेखी परीक्षा संपत आल्यावर दहावीनंतर काय करायचे? अशा विवंचनेत पालक असतात. परिणामी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने धोकेही उद्‍भवतात. त्यासाठी विद्यार्थी व पालकांनी विचारपूर्वक साईट निवडणे, हेच योग्य आहे.

दहावी हा जिवनातील करिअर, व्यक्तिमत्त्वासाठी विद्यार्थ्याचे पहिले पाऊल असते.  पारंपरिक शिक्षण पद्धतीचे पालन करीत असल्याने साधारण आठवी-नववीच्या वर्षातच पुढे काय? याची दिशा काही प्रमाणात ठरलेली असते. अनेकदा अपेक्षेपेक्षा अधिक तर बहुतेकवेळा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात अन् ठरलेल्या फॅकल्टीपेक्षा वेगळा मार्ग निवडायचा का? असा गोंधळ निर्माण होतो. तर अनेकदा आधी निकाल लागू दे मग बघू? अशीही मानसिकता विद्यार्थ्यांसह पालकांची असते.     

हेही वाचलेच पाहिजे - किती जणांना माहीत आहे गुढीपाडव्याचे कडुलिंबाशी नाते...

वाणिज्य शाखाही करिअरसाठी महत्त्वाची
वाणिज्य शाखा ही बहुपर्यायी मानली जाते. एकतर कॉमर्सची पदवी घेत असतानाच, सी.ए. बेसिक प्रोग्रॅम कोर्स करता येतात, कंपनी सेक्रेटरी, टॅक्स कन्सल्टंट, विधी शाखा, बँक परीक्षा, फायनान्स विभाग, आदी अनेक पर्याय या विभागात उपलब्ध आहेत. कॉमर्स पदवीनंतर विद्यार्थ्यांना एमबीए आणि संगणक विभागाकडेही वळता येते. सध्या एमबीएमध्ये एचआर, फायनान्स अन् मार्केटिंगकरिता देखील चांगली संधी निर्माण झालेली आहे.

विज्ञान शाखेतही आहे असंख्य संधी
विज्ञान शाखेची निवड आजही मेडिकलसाठीच केली जाते. यातही एमबीबीएस हा महत्त्वाचा भाग असतो. बारावी सायन्सनंतर मेडिकलमधल्याच अनेक फॅकल्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात.  त्यापैकी डीएमएलटी, एमएलटी, एक्सरे टेक्निशियन, फार्मसी, रिसर्च आदी शाखांकडे विद्यार्थ्यांना जाता येते. याशिवाय बीएस्सी केल्यानंतर कृषी पदवीकडे वळता येतेच, शिवाय जीवशास्त्रातील आधुनिक वाटा आपल्याशा करता येतात.  बारावी सायन्सनंतर विद्यार्थी विधी शाखेसह संगणक शाखेकडेही वळू शकतो. सध्या सर्व कार्यालये डिजिटल होत असल्याने संगणक पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांना नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध झालेल्या आहेत.  

हे देखील वाचा - सात वर्षानंतर निर्भयाला मिळाला न्याय, काय म्हणतात महिला

कला शाखा म्हणजे सुवर्णसंधीच
कला शाखेतून भारतीय संगीत, गायन, वादन, अभिनय, साहित्य, विद्या, भाषा, या पारंपरिक क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम अन् आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध आहेत. १२ वीनंतर स्पेशलायझेशन करता येते. या सर्व अभ्यासक्रमांना भारतासह इतर देशांतही मागणी आहे. याशिवाय बारावीनंतर विद्यार्थी विधी शाखेकडे वळू शकतो.  विधी अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना अनेक पर्याय नोकरीच्या अन् करिअरच्या, मास्टरकीच्या, सरकारी तसेच खासगी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. बारावी कलेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना डीएड, बी.एड, बीपीएड आदी पर्यायही खुले आहेत. शिवाय कला शाखेतून पदवी घेतल्यानंतर विद्यार्थी एम.ए, एमफीएल, डॉक्टरकी आदींच्या माध्यामातून प्राध्यापकी करू शकतात. याशिवाय आर्ट्स स्कूलच्या माध्यमातून करिअर करीत आपल्यातील हस्तकौशल्याला वाव देण्याचाही एक पर्याय या विद्यार्थ्यांसमोर असतोच. 

हेही वाचाच - नांदेडमधील ‘ही’ सामाजिक संस्था जपतेय मानवी मूल्य, कोणती? ते वाचायलाच पाहिजे

करिअर निवडताना धोके टाळावेत
दहावीनंतर डॉक्टर आणि अभियंता होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतात. मात्र अकरावी व बारावीत भौतिक, रसायनशास्त्र आणि गणिती या ग्रुपमध्ये त्यांची टक्केवारी खालावते. तसेच सीईटी व नीट परीक्षेतही गुणांकन कमी होते. साहजिकच त्याचा बारावीच्या गुणांवर परिणाम होतो. अपेक्षित ट्रॅकला प्रवेश मिळत नसल्याने मग मुले दहावीच्या गुणांवर डिप्लोमा करतात. या सर्वांमध्ये दोन वर्षे वाया जातात. मुळातच ही त्यांची आवड नसल्याने ते या शिक्षणात रमू शकत नाहीत. त्यामुळे आपण जो अभ्यासक्रम निवडतो तो आपल्या कितपत झेपेल याचा विचार करूनच विद्यार्थी आणि पालकांनी करिअरच्या वाटा शोधल्या पाहिजेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make The Right Decision After The Tenth Nanded News