esakal | सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला अखेर मान्यता; यंदा पहिली बॅच
sakal

बोलून बातमी शोधा

medical college

काही दिवसांपूर्वी यासाठी केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता. त्यानंतर राज्यातील अन्य तीन मेडिकल कॉलेजना परवानगी दिली होती.

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजला अखेर मान्यता; यंदा पहिली बॅच

sakal_logo
By
-विनोद दळवी

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना गणपती बाप्पा पावला असून आज नॅशनल मेडिकल कमिशनकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी यासाठी केंद्रीय समितीने पाहणी दौरा केला होता. त्यानंतर राज्यातील अन्य तीन मेडिकल कॉलेजना परवानगी दिली होती; परंतु सिंधुदुर्गला मिळाली नव्हती. ती मिळाली. यामुळे चालू वर्षात या महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांची पहिली बॅच सुरू होणार आहे. ही माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. या कॉलेजमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टरांची टंचाई कमी होऊन जिल्हा वैद्यकीय क्षेत्रात स्वावलंबी होणार असल्याचा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

खासदार राऊत यांनी याबाबत माहिती देण्यासाठी तळगाव येथील आपल्या निवासस्थानी आज दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश निकम, छोटू पारकर आदी उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, ‘‘​सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली काही वर्षे सातत्याने मागणी होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात गेली काही वर्षे सातत्याने आम्ही पाठपुरावा करत होतो. आमच्या या मागणीला यश आले असून सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनने अखेर मान्यता दिली आहे.’’

हेही वाचा: महाराष्ट्राला डेल्टापासून धोका कायम, AY.4 ची रुग्णसंख्या जास्त

यासाठी राज्य शासनाने ९६६ कोटींचे आर्थिक बजेट मंजूर केले आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी हे मेडिकल कॉलेज होणार आहे. एक वर्ष जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी वापरले जाणार आहेत. शासनाने प्राचार्य नियुक्त केले आहेत. अधिकारी व कर्मचारी पदे मंजूर केली आहेत. तीन वर्षांत मेडिकल कॉलेजची स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहेत. लागणाऱ्या फर्निचरसाठी निविदा काढण्यात आली आहे. भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी मिळाल्याने या वर्षीपासून येथे प्रत्यक्ष बॅच सुरू होणार आहे. परिणामी जिल्ह्यात येत्या काही वर्षांत डॉक्टर तयार होऊन जिल्ह्यात डॉक्टरांची भासणारी उणीव कमी होणार आहे, असे सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना मेडिकल कॉलेज सुरू करण्याचे वचन जिल्हावासीयांना दिले होते. तो शब्द त्यांनी पाळला आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत, आपण, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न केले असले तरी जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी यासाठी सहकार्य केले आहे. या सर्वांचे आपण ऋणी आहोत. यापुढेही असेच सहकार्य नागरिकांचे लाभो, अशी अपेक्षा व्यक्त करताना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे जिल्हावासीयांच्यावतीने आभार व्यक्त केले.

हेही वाचा: राजला जामीन मंजूर होताच शिल्पाची खास पोस्ट

मुख्यमंत्र्यांमुळे झाले वैद्यकीय महाविद्यालय

आतापर्यंत जे मंत्री, मुख्यमंत्री झाले त्यांनी स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय काढले; मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच साकार झाल्याचा टोला खासदार राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

loading image
go to top