पहिल्याच प्रयत्नात IPS झाल्यानंतरही पुन्हा परीक्षा देऊन बनली IAS 

सूरज यादव
Saturday, 18 July 2020

जर्मनीमध्ये तिला नोकरीची ऑफर मिळाली पण समाजसेवा करायची असल्यानं तिने नोकरी न स्वीकारता भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली - युपीएससी परीक्षेत एकदा यश मिळवण्यासाठी लोक कितीतरी कष्ट करत असतात. तर काही उमेदवार असे असतात जे पुन्हा पुन्हा यामध्ये यशस्वी होतात. मध्य प्रदेशातील एका लहानशा गावातील गरिमा अग्रवालही त्यापैकीच एक. लहानपणापासून हुशार विद्यार्थीनी म्हणूनच तिची ओळख होती. मात्र पुढचा प्रवास खूपच कठीण होता. गरिमाने तो संघर्ष करून यशाला गवसणी घातली. आज तिचं यश अनेकांना प्रेरणा देणारं आहे. 

गरिमा मातृभाषेतून परीक्षा देणाऱ्यांसाठी प्रेरणा आहे. तिने हिंदी माध्यमातून शिक्षण घेतलं. तिचं पूर्ण शिक्षण स्टेट बोर्डात झालं. दहावीमध्ये 92 टक्के आणि बारावीत 89 टक्के मार्क मिळवल्यानंतर तिला रोटरी इंटरनॅशनल यूथ एक्स्चेंज प्रोग्रॅम अंतर्गत एक वर्षासाठी मिनेसोटा, अमेरिका इथं हायर सेकंडरी एज्युकेशन पूर्ण करण्याची संधी मिळाली. तिची आई गृहिणी तर वडील बिझनेसमन आहेत. गरिमाच्या मोठ्या बहिणीनेसुद्धा युपीएससी पास करून इंडियन पोस्टल सर्विस जॉइन केली आहे. अशा कुटुंबातून मिळणारा पाठिंबा आणि शिक्षणाचं वातावरण असलं तरी अभ्यासासाठी करावं लागणारं कष्ट कमी होत नाही. 

हे वाचा - पैसे उधार घेऊन दिली परीक्षा; IAS झाल्यावर म्हणाला,'इतरांच्या यशोगाथा वाचल्या आता...'

एका मुलाखतीवेळी गरिमा म्हणाली की, तुमच्या घरचे लोकही या सेवेत असतात याचा फायदा होतो. पण अभ्यास तुम्हालाच करावा लागतो. त्यासाठी करावा लागणारा संघर्ष तुमचाच असतो आणि त्यातून तुमची सुटका होत नाही. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गरिमाने जेईई दिली आणि त्यात सिलेक्टसुद्धा झाली. त्यानंतर पुढे आयआयटी हैदराबादमधून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर जर्मनीत इंटर्नशिप केली. जर्मनीमध्ये तिला नोकरीची ऑफर मिळाली पण समाजसेवा करायची असल्यानं तिने नोकरी न स्वीकारता भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 

गरिमाने दीड वर्षे परीक्षेसाठी अभ्यास केल्यानंतर 2017 मध्ये पहिल्यांदा युपीएससी दिली. पहिल्याच प्रयत्नात तिनं यशही मिळवलं. यात तिला 241 वी रँक मिळाल्यानंतर आयपीएस सर्व्हिस मिळाली होती. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या यशाचं समाधान होतं पण गरिमाला आयएएस व्हायचं होतं. इकडे आयपीएसचं प्रशिक्षण सुरू झालं तरी तिने अभ्यास बंद केला नाही. ट्रेनिंग सुरू असतानाच तिनं अभ्यासही चालु ठेवला. त्यानंतर पुन्हा 2018 मध्ये परीक्षा देत तिनं 40 वी रँक मिळवली. यामुळे तिच्यासाठी आयएएस होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

हे वाचा - वडिलांच्या हत्येनंतर 22 लाखांची नोकरी सोडून बनला IPS; पोलिस दलातील सुपरहिरोची कहाणी

IPS झाल्यानंतर पुन्हा IAS ची तयारी आणि त्यातही यश मिळवल्यानंतर गरिमाने तिनं यासाठी काय कष्ट घेतले ते सांगितलं. हिंदी माध्यमातून शिकल्यानंतर इंग्रजीतून परीक्षा देणं आणि बातम्या वाचणं सोपं नव्हतं. सुरुवातीला फक्त पेपर वाचायलाच तीन तास लागायचे. हिंदी माध्यमाऐवजी इंग्रजीतून परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला कारण अभ्यासासाठी आवश्यक असलेलं साहित्य इंग्रजीत सहज उपलब्ध होतं. इंजिनिअरिंगमध्ये तिला भाषेची फारसी अडचण आली नाही. युपीएससीच्या मुख्य परिक्षेत इफेक्टिव उत्तरं लिहणं मोठं आव्हान होतं. त्यासाठी लिखाणाचा सराव केला. 

हे वाचा - अपयश आल्यावर वडील म्हणाले,'फक्त शेत विकलंय अजून किडनी आहे'; मुलगा दुसऱ्याच प्रयत्नात झाला IPS

वेळेचं नियोजन करताना लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दुर राहण्यावर भर दिला असं गरिमा म्हणते. यासाठी सोशल मीडियाचा वापर जवळपास बंदच केला. एक ते दीड वर्षे पुर्णपणे झोकून तयारी केल्यास यश मिळू शकतं. फक्त या काळात तुमचं लक्ष केवळ परीक्षा आणि अभ्यास यावरच असलं पाहिजे. आपल्या यशात आई वडीलांनी दिलेला पाठिंबाही महत्वाचा ठरला. समाज आणि लोक काय म्हणतील यापेक्षा त्यांनी मुलांवर विश्वास ठेवला असंही गरिमा म्हणाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp IAS garima agrawal who got IPS rank in first attempt