esakal | पॅरामेडिकल अभ्यासक्रम आता वैद्यकीयच्या सेवा प्रवेश नियमात | Paramedical Education
sakal

बोलून बातमी शोधा

Education

पॅरामेडिकल अभ्यासक्रम आता वैद्यकीयच्या सेवा प्रवेश नियमात

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : राज्यातील पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचे (Paramedical Syllabus) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या (Medical Education Department) सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख (Medical Education Minister Amit Deshmukh) यांनी सोमवारी (ता.चार) दिले आहेत. त्यामुळे घरघर लागलेल्या या पॅरामेडिकल अभ्यासक्रमा्ला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल कोर्सला घरघर लागली आहे. शासनाचे धोरण आणि महाविद्यालयांची उदासीनता याला कारणीभूत ठरत आहे. याचे ना प्रवेश ना प्रसिद्धी त्यामुळे हे अभ्यासक्रमच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील हे तेरा अभ्यासक्रम असून सुमारे दोन हजार जागा आहेत. राज्य शासनाने याकडे लक्ष दिले तर शासकीय आणि खासगी आरोग्य क्षेत्रासाठी दरवर्षी दोन हजार कौशल्य असलेले मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: थकीत ऊस बिलासाठी वारंवार चकरा, शेतकऱ्याच्या पदरी निराशा

या विषयाला 'सकाळ'ने नऊ सप्टेंबर रोजी वाचा फोडली होती. याची दखल राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतली आहे. यातून श्री. देशमुख यांनी सोमवारी (ता.चार) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पॅरामेडिकल कोर्सबाबत बैठक मुंबईत मंत्रालयात घेतली. सध्या राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 13 पॅरामेडिकल कोर्सेस (बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) अभ्यासक्रम सुरु असून साधारणपणे यासाठी दोन हजार जागा उपलब्ध आहेत. या पदवीधारक विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच अधिकाधिक मनुष्यबळ शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध होईल. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहिती अधिक होण्याकरिता जिल्हास्तरावरील महाविद्यालयांमार्फत जास्तीत-जास्त वृत्तपत्रात प्रसिध्दी देण्यात यावी.

हेही वाचा: Skoda Auto ची भारतात ही कार दाखल, किंमत ११.९९ लाखांपासून सुरु

पॅरामेडिकल अभ्यासक्रम हे कौशल्यावर आधारीत पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे कोविड-19 काळात दिसून आले आहे. येणाऱ्या काळात या 13 अभ्यासक्रमांमधील कोणत्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. याबाबतचा अभ्यास करुन त्यांची पुनर्रचना वैद्यकीय शिक्षण संचालकांनी करावी. तसेच अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रमामध्ये आवश्यक बदल व श्रेणी वर्धनाच्या दृष्टीने अभ्यासगट म्हणून उच्चस्तरीय समिती गठीत करुन त्याची पुनर्रचना करण्यात यावी, अशा सूचनाही श्री. देशमुख यांनी या बैठकीत दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात या अभ्यासक्रमाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, उपसचिव सुरेद्र चानकर, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे डॉ. सुशिल दुबे, डॉ. अरुणकुमार व्यास यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top