ज्या कंपनीची मिळालेली नोकरी सोडली तिथंच केलं मार्गदर्शन, वाचा IPS अधिकाऱ्याची कहाणी

ips vikas vaibhav
ips vikas vaibhav

नवी दिल्ली - ज्या संस्थेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्याच संस्थेतील कर्मचाऱ्यांना, पदादिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळणं हे भाग्यच. असंच भाग्य बिहारचे 2003 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी विकास वैभव यांना लाभले. त्यांनी व्हर्च्युअल संवादाच्या माध्यमातून इन्फोसिसच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अनेकांनी त्यांना प्रश्न विचारले त्याचीही उत्तरे विकास यांनी दिली. विकास वैभव म्हणाले की,'2001 मध्ये त्यांचीही इन्फोसिसमध्ये निवड झाली होती.' तेव्हा सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. त्यानंतर विकास यांनी कंपनी जॉइन करण्याऐवजी युपीएससी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. 

विकास वैभव यांनी सांगितलं की,  माझे उच्च शिक्षण आयआयटी कानपूर इथं झालं. तिथं शिक्षण झाल्यानंतर लोक कार्पोरेट जगतात नोकरी धरतात. मात्र मला स्वत:ला तेवढ्यापुरतं मर्यादीत नव्हतं ठेवायचं. देशासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. 

2001 मध्ये आयआयटी कानपूरमधून ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2003 मध्ये आयपीएस बनले. आयपीएस म्हणून काम करताना विकास वैभव यांनी नक्षलग्रस्त भागात काम केलं आहे. याशिवाय त्यांनी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) मध्येही एसपी आणि पटना इथं एसएसपी म्हणून काम केलं आहे. सध्या ते बिहार एटीएसमध्ये कार्यरत आहेत. सिव्हील सेवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यांना कॉपगुरु या नावानेही ओळखतात. विकास वैभव हे बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील बीहट इथंले आहेत. 

इतिहासाची आवड असलेले विकास वैभव हे सायलंट पेजेस ट्रॅव्हल्स इन द हिस्टॉरिकल लँड ऑफ इंडिया या नावाने ब्लॉगही लिहितात. यामध्ये ते देशातील वेगवेगळ्या भागाबाबत ऐतिहासिक तथ्यांची माहिती देतात. याशिवाय युट्यूब चॅनेल विकास वैभव आयपीएस आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात. 

2009 मध्ये विकास वैभव यांना संत्येंद्र दुबे पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार पारदर्शकता आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांना दिला जातो. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी सत्येंद्र दुबे यांनी 2003 मध्ये  स्वर्णिम चतुर्भुज योजनेत चाललेल्या घोटाळ्याबद्दल पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर बिहारमधील गया जिल्ह्यात त्यांची हत्या झाली होती. त्यानंतर 2005 मध्ये सत्येंद्र दुबे यांच्या सन्मानार्थ पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासून हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. पहिला पुरस्कार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com