
Winter Recipe : पारंपरिक पद्धतीने कळण्याची भाकरी आणि ठेचा कसा तयार करायचा?
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अशा अनेक ठिकाणी भाकरी खाण्याची पद्धत आहे. कारण भाकरी हे परिपूर्ण अन्न आहे. अनेक प्रकारच्या धान्यापासून भाकरी करता येते. काही भागात तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, ज्वारी आणि उडीद एकत्र करून कळण्याच्या पिठाची भाकरी करतात. काही जण सर्व प्रकारच्या धान्याचे पीठ एकत्र करून त्याची भाकरी करतात. ज्यामुळे सर्व प्रकारची तृणधान्ये आहारातून शरीरात जातात.
भाकरीमधून शरीराला पुरेसे फायबर्स, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, कार्बोहायड्रेड मिळतात. ज्यामुळे तुम्ही तुमच्या गव्हाच्या पोळीच्या ऐवजी आहारात सर्व प्रकारच्या धान्याच्या भाकरीचा नक्कीच समावेश करू शकता. कारण ती आरोग्यासाठी जास्त लाभदायक आहे. गव्हाच्या पोळीत जास्त प्रमाणात ग्लुटेन असते. शिवाय एका ठराविक वयानंतर गव्हाची पोळी खाण्यामुळे अॅसिडिटीची समस्या वाढू लागते. वयोमानानुसार शारीरिक फिटनेससाठी भाकरी खाणं फायद्याचं ठरतं. भाकरी खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या आणि मेंदूच्या कार्याला चांगली चालना मिळते.
आजच्या लेखात आपण हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारी ज्वारीची भाकरी आणि ठेचा कसा तयार करतात याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.
साहित्यः
1) कळण्याचे पीठ
(दोन किलो, ज्वारी एक किलो आख्खे उडीद दळून आणावेत)
2) मीठ
3) कोमट पाणी
कृती:
कळण्याचे पीठ दळून आणल्यानंतर त्यात जेवढ्या भाकरी करायच्यात तेवढे पीठ घेउन चवीप्रमाणे मीठ टाकावे. कोमट पाण्यात व्यवस्थित रगडुन पीठाचा गोळा तयार करावा. कुठल्याही भाकरीच्या पीठाला जेवढे रगडले तेवढे ते एकजीव होते आणी भाकरीला तडे जात नाहीत. सुरवातीला हातावर कोरडे पीठ घेउन या मळलेल्या पीठाचा छोटा गोळा दोन्ही तळहाताच्या खोलगट भागातच फिरवावा. मधे जाड आणि कडेला बारीक असा हा गोळा नंतर परातीत खाली थोडे कोरडे पीठ पसरावून त्यावर टाकावा व एका हातानेच गोल गोल फिरवत थोडा मोठा करावा. परातीला भाकरी चिटकु देउ नये ही काळजी घ्यावी.
आता एका बाजुने भाकरी हळुच उचलुन दोन्ही तळव्यांवर खालच्या कोरड्या पीठाचा भाग वरती येइल अशा रितीने उचलावी . आता भाकरीच्या वरच्या बाजुला पाणी गोल फिरवत लावावे. म्हणजे आणि ते पाणी वाळायच्या आत ती भाकरी उलथावी.
पाणी वाळल्यावर भाकरी उलटवली तर तडे जातात त्यामुळे गॅस जोरातच असावा.आता भाकरी त्या बाजुने थोडीशी शेकली की तवा काढुन टाकावा. भाकरी त्याच अवस्थेत उलथणे आणि सांडशी (किंवा दुसरे उलथणे)यावर पेलत डायरेक्ट गॅसवर शेकावी म्हणजे छान पोपडा येतो! सांडशी आणि उलथणे यावर ती भाकरी शेकत जाईल तशी तशी पेलवत फिरवावी. सगळ्या बाजुने झाल्यावर टोपलीत टाकावी.हो डब्याऐवजी काड्यांच्या टोपलीत भाकरी ठेवतात. आता भाकरीचा पोपडा एका बाजुने मोकळा करावा. म्हणजे आतील वाफ रिलीज होते.अशा रितीने भाकरी तयार झाली आहे. भाकरी तयार झाली की त्याच गरमगरम तव्यावर मस्त खरपुस हिरव्या मिरच्या लसूण जिरे भाजून घ्यावे आणि त्यात मीठ टाकून मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करावा आणि कळण्याची भाकरी,ठेचा,दही यावर मस्त ताव मारावा.