...पुढच्या वर्षी लवकर या; पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh visrjan

...पुढच्या वर्षी लवकर या; पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप

इचलकरंजी: गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या! असा जयघोष करत पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप द्यावा लागणार आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पालिका प्रशासनानेही पर्यावरणपूरक उत्सवासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. गणपतींना निरोप दिला जाणार असून त्यासाठी शहापूर खणीवर तयारी पूर्ण केली आहे.

हेही वाचा: गडहिंग्लज: गौरी गणपती विसर्जनासाठी २२ कृत्रिम कुंड

शहरात ३० ठिकाणी विसर्जन कुंडाची व्यवस्था केली आहे. प्रशासनाने मूर्तीदान आणि निर्माल्य दान करून पाणीप्रदूषण टाळण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी शहापूर खणीची पाहणी करून तयारीची माहिती घेतली.

महापालिका प्रशासनाने मोठ्या संख्येने दान होणाऱ्या मूर्ती, निर्माल्य संकलित करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित केली आहे. नागरिकांनी दान केलेल्या मूर्ती सजवलेल्या वाहनातून शहापूर खणीत विसर्जित करण्यात येणार आहेत. काही स्वयंसेवक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना सूचना देताना दिसतील. पालिकेने प्रत्येक ठिकाणी एक कुंड, निर्माल्यसाठी मोठा बुटा यांसह साहित्यासह चार कर्मचारी ठेवले आहेत.

पंचगंगा नदीवर पूर्णतः गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातली आहे. नदीघाटावर जाणारे मुख्य व अंतर्गत मार्ग बंद विसर्जनासाठी बंद केले आहेत. केवळ वाहतूकच या मार्गावरून सुरू राहणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करून वाहतुकीसाठी हा मार्ग दिवसभर सुरू राहील. शहरातील प्रत्येक कृत्रिम कुंडावर दोन पोलिस कर्मचारी असतील. गर्दी न करता नियमांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन पोलिस उपाधीक्षक बी.बी. महामुनी यांनी केले आहे.

दरम्यान प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी शहापूर खणीची पाहणी करून तयारीची माहिती घेतली. सर्व ठिकाणाहून संकलित झालेल्या गणेशमूर्ती शहापूर खणीत विसर्जन करण्यात येणार आहेत. एकेरी वाहतूक यासह आपत्कालीन व आरोग्य यंत्रणा दिवसभर तैनात ठेवण्याच्या सूचना अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिल्या. अप्पर तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, पोलिस निरीक्षक ताशीलदार, यादव आदी उपस्थित होते.

केंदाळचे काम जलदगतीने करा

घरगुती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी शहापूर खणीची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात खणीत केंदाळ असल्याचे निदर्शनास आले. पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत जलद गतीने केंदाळ काढण्याच्या सक्त सूचना दिल्या. विसर्जनावेळी सर्व विघ्न दूर करून काटेकोर तयारी करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :Kolhapur