esakal | त्वं गुणत्रयातीतः।
sakal

बोलून बातमी शोधा

त्वं गुणत्रयातीतः।

त्वं गुणत्रयातीतः।

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. आर्या जोशी

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण ज्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतो तो गजमुख म्हणजे हत्तीचे मुख आणि माणसाचे शरीर असलेला हा देव. तो चार हातांचा, सुपासारखे कान असलेला, एकच दात असलेला गणपती आपल्याला पूजनीय, वंदनीय ठरला आहे.

हेही वाचा: त्वं ज्ञानमयः विज्ञानमयः

गणेशाच्या विविध मूर्ती आपल्याला भारतात आणि भारताबाहेर अन्य संस्कृतींमधेही पहायला मिळतात. या मूर्तींच्या हातांमध्ये आपल्याला विविध गोष्टी दिसतात. गणेशाच्या हातामध्ये परशु आहे. पराक्रमाचे, वीरतेचे ते प्रतीक आहे. वीरतेसाठी सुदृढ शरीर, उत्तम बाहुबल, स्थिर मन बुद्धी या सर्वांचीच आवश्यकता असते. गणेशाच्या हाती पाशही आहे. पाश म्हणजे नियंत्रण. दुष्टांच्या कृत्यांवर पाश टाकून त्यांना बंधनात ठेवणारा गणपती. त्याच्या हातातील पाश हा स्वतःवरील नियंत्रणाचेही द्योतक आहे. गणेशाच्या हाती असलेला अंकुश हाही उन्मत्त हत्तीला आवरण्यासाठीच वापरला जातो. तो स्वतः गजमुख आहेच आणि त्याच्याच हाती अंकुश आहे. वाईट प्रवृत्तींना काबूत ठेऊन त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी अंकुशाची आवश्यकता भासतेच. स्वतःच्या मनाच्या चंचलपणाला, विचारांच्या अनावश्यक गतीला ताब्यात ठेवण्यासाठी आपल्यालाही अंकुश हाती घ्यावाच लागतो.

हेही वाचा: त्वं ज्ञानमयः विज्ञानमयः

गणपतीला मोदक आवडतो. मोद म्हणजे आनंद. सोंडेमध्ये मोदक धरलेला बाप्पा बालगोपाळांनाही प्रिय आहे. प्राणप्रतिष्ठित गणपतीच्या हातावर घरातला छोटेखानी मोदक ठेवण्याचं धारिष्ट्य दाखवण्यात लहान मुलांना विलक्षण आनंद मिळतो. आयुष्यातील भौतिक सुखांचा आनंदही तितकाच महत्वाचा असतो हे तर मोदकप्रियतेतून बाप्पा सुचवत नसावा!

परंतु याच जोडीने मानवी जीवनाचे पूर्णत्व सामावलेले आहे आध्यात्मिक उन्नतीमध्ये. मन आणि बुद्धीला स्थैर्य आणण्यासाठी आध्यात्मिक साधनेची जोडही तितकीच महत्त्वाची ठरते. त्यामुळेच की काय गणपतीच्या हाती रूद्राक्षमाला/अक्षमाला आहे.

हेही वाचा: नारळाच्या मागणीत यंदाही घट

गणपतीच्या विविध रूपांमागे अशा विविध रंजक संकल्पना दडलेल्या आहेत. त्यामागील रूपक उलगडण्याचा प्रयत्न या गणेशोत्सवात करूयात. गणपती हा सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्याही पलीकडचा असा आहे असं अथर्वशीर्षात म्हटलं आहे.हे त्याचं आध्यात्मिक रूप. तरीही गणपतीच्या बाह्य रूपात दडलेल्या गुणवैशिष्ट्यांपैकी अनेक गुणांचा अवलंब करीत शरीर मन बुद्धी यांचा समतोल राखून आपले व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचा संकल्प करूया.

loading image
go to top