esakal | Hartalika Teej 2021: या पद्धतीने करा हरतालिकेची पूजा
sakal

बोलून बातमी शोधा

Hartalika Teej 2021: या पद्धतीने करा हरतालिकेची पूजा

यंदा गुरुवारी, 09 सप्टेंबर 2021 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. अनेक ठिकाणी हरितालिका व्रत साजरे केले जाते.

Hartalika Teej 2021: या पद्धतीने करा हरतालिकेची पूजा

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

हरतालिका उत्सव गणपती मध्ये साजरा केला जातो. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला 'हरतालिका`असे म्हणतात. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत केले जाते. यंदा गुरुवारी, 09 सप्टेंबर 2021 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. अनेक ठिकाणी हरितालिका व्रत साजरे केले जाते.

हेही वाचा: Hartalika Puja : महिला का करतात हरितालिका व्रत?

हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका ' असे म्हणतात. या दिवशी मुली व सुवासिनींनी सुवासिक तेल लावून स्नान करावे. घरामध्ये एका जागी चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर रांगोळी काढून व केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर विडा मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.

हेही वाचा: हरितालिका उत्सव आरोग्याचा 

सुरवातीला स्वत:ला हळद कुंकू लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्‍या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजेला सुरवात करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे.

हेही वाचा: Ganesh Chaturthi 2021: गणेश मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता?

पूजेसाठी लागणारे साहित्य:

चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, आसन, निरांजन, घंटा, समई, कापूरारती, हळदकुंकू, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या किंवा तेलाच्या वाती विड्याची पाने, सुपारी, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, तसेच फणी, काजळ, गळेसरी, कांकणे, आरसा इत्यादी. याव्यतिरिक्त फुले, दूर्वा, तुलसीपत्रे, व झाडांची पाने हे साहित्य पूजेला लागतात.

हेही वाचा: गणेश आरती

पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोकाची पाने या पद्धतीने पत्री वाहतात. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. दिवसभर कडक उपोषण करावे. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते खावे. दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून महिला उपवास सोडतात.

loading image
go to top