कोरोनाची लागण झाल्यास मिळणार 1,250 डॉलर; घोषणेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला 1250 डॉलर (भारतीय चलनानुसार 94 हजार रुपये) दिले जाणार आहेत.

कॅलिफोर्निया - जगभरात कोरोनाचा कहर वाढला आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझिल आणि भारतात रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेत कॅलेफोर्नियातील एका भागामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला 1250 डॉलर (भारतीय चलनानुसार 94 हजार रुपये) दिले जाणार आहेत. हे पैसे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी खाण्याचा खर्च, भाडं आणि फोनचं बिल भरण्यासाठी वापरता येणार आहेत. जगभरातील सोशल मीडियावर या घोषणेची चर्चा सुरू आहे. 

कॅलिफोर्नियातील अलामेडा काउंटीमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. इथल्या प्रशासनाचे म्हणणे आहे की, कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांना दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन करण्यात येतं तसंच त्यांना आयसोलेट करावं लागतं. यासाठीचा खर्च न पेलवणारा आहे. तसंच सुविधाही उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मदत कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

हे वाचा - मॉरिशसमध्ये 4000 टन इंधन गळतीमुळे आणीबाणी; फ्रान्सकडे मागितली मदत

लॉस एंजेलिस टाइम्सच्या रिपोर्टनुसार, काउंटी बोर्डाने सर्वांच्या परवानगीने ही योजना आखली आहे. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला तर संबंधित रुग्णांना 94 हजार रुपये देण्यात येणार आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की, जर लोक टेस्ट करण्यासाठी घाबरत असतील किंवा पुन्हा आयसोलेट झाले नाहीत तर कोरोनाला रोखणं कठीण जाईल. 

योजनेच्या अंमलबजावणीची तयारीसुद्धा प्रशासनाने केली आहे. सरकारने या योजनेसाठी काही नियमही केले आहेत. कोरोनाची चाचणी प्रशासनाने मान्यता दिलेल्याच क्लिनिकमध्ये करावी लागेल. तसंच त्या व्यक्तीला पगारी रजा नसावी किंवा त्याला बेरोजगार भत्ता आधीपासून मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

हे वाचा - अमोनियम नायट्रेट - वरदायी आणि विनाशकारीही

अमेरिकेतील अलामेडा काउंटीला आशा आहे की नव्या निर्णयामुळे कोरोना बाधित झाल्यानंतर लोक स्वत:हून आयसोलेट होतील. तसंच योजनेमुळे ज्यांच्यात लक्षणं दिसतात असे लोक कोरोनाची टेस्ट करण्यासाठीही पुढे येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alameda county program pay to tested covid 19 positive