US संसदेबाहेरील हिंसाचारात जखमी पोलिसाचा मृत्यू; मृतांचा आकडा 5 वर

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

कॅपिटल हिलमध्ये (अमेरिकी संसद भवन) बुधवारी झालेल्या हिंसाचारामध्ये जखमी झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- कॅपिटल हिलमध्ये (अमेरिकी संसद भवन) बुधवारी झालेल्या हिंसाचारामध्ये जखमी झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हिंसाचारात मृत्यू पडलेल्यांचा आकडा वाढून 5 झाला आहे. यूएस कॅपिटल पोलिस अधिकारी ब्रायन डी सिकनिक बुधवारी निदर्शकांसोबत झालेल्या झडपेत गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर सिकनिक यांना आपल्या कार्यालयात आणण्यात आलं होतं, त्यानंतर ते बेशुद्ध झाले. 

अमेरिकेत हिंसाचारावेळी तिरंगा कुणी फडकवला? व्यक्तीची ओळख पटली

यूएस कॅपिटल पोलिसांनी म्हटलंय की, सिकनिक यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिकनिक आपल्या ड्यूटीदरम्यान जखमी झाले होते, त्यानंतर रात्री त्यांचा मृत्यू झाला. सिकनिक यांच्या मृत्यूचा तपास मेट्रोपोलिटन पोलिस विभाग, यूएससीपी तसेच फेडरल एजेंसी करतील. 

काँग्रेस सदस्य लॉयड डॉगेट यांनी गुरुवारी ट्विट केलंय. बुधवारी झालेल्या दंगलीत यूएस कॅपिटल पोलिसाच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी भडकावल्यामुळे आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना यासाठी जबाबदार धरलं पाहिले, असं ते म्हणाले आहेत. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे आतापर्यंत कमीतकमी 50 पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. त्यातील 15 जण गंभीर जखमी आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकी संसदेवर हल्ला केलेल्या ट्रम्प समर्थकांची संख्या मोठी होती, त्या तुलनेने पोलिस अधिकारी कमी होती. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागली. अनेकांनी पोलिसांवर हल्ला केला होता.

'आता कसं वाटतंय?' US Capitol घटनेवर चीनच्या अमेरिकेला कानपिचक्या;...

दरम्यान, ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमध्ये बुधवारपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ते गोंधळ घालतील, अशी शंका असल्याने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पोलिसांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या समर्थकांनी थेट कॅपिटलची सुरक्षा यंत्रणा भेदून आत घुसखोरी करत तोडफोड केली. या धक्कादायक प्रकारामुळे मतमोजणी प्रक्रियेत अडथळा येऊन संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष माइक पेन्स आणि इतर सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. या समर्थकांचा पोलिसांबरोबरही संघर्ष झाला. या संघर्षात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनेक जणांना अटकही केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america capitol hill violence police officer death total toll 5