esakal | जगातील कर्मचाऱ्यांना बायडन यांचा दिलासा; ट्रम्प यांचा ग्रीन कार्डबाबतचा निर्णय रद्दबातल

बोलून बातमी शोधा

BIDEN}

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीयांसहित संपूर्ण जगातील कर्मचारी लोकांना खुशखबर दिली आहे.

global
जगातील कर्मचाऱ्यांना बायडन यांचा दिलासा; ट्रम्प यांचा ग्रीन कार्डबाबतचा निर्णय रद्दबातल
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीयांसहित संपूर्ण जगातील कर्मचारी लोकांना खुशखबर दिली आहे. देशात ग्रीन कार्डवरील बंदी हटवून त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला केराची टोपलीच दाखवली आहे. या मोठ्या निर्णयाने अमेरिकेतील लाखो भारतीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. ग्रीन कार्डवरील बंदीमुळे अमेरिकेतील वैध प्रवास देखील थांबवला गेला होता. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे वाढत्या बेरोजगारीला निपटण्याचं कारण देत 2020 च्या शेवटापर्यंत ग्रीन कार्ड जारी करण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर त्याची मुदत वाढवून 31 डिसेंबरवरुन या वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत ती करण्यात आली होती. 

हेही वाचा - कॅनडामध्ये आकाशात दिसली मोठी पेटलेली उल्का; अण्वस्त्र हल्ल्याच्या भीतीने घाबरगुंडी

बायडन यांनी म्हटलं की वैध प्रवासास रोखणे अमेरिकेच्या हिताचे नाही. याउलट यामुळे अमेरिकेचंच नुकसान होऊ शकतं. कारण या निर्णयामध्ये अमेरिकन नागरिक अथवा वैध स्थायी रहिवाशांना त्यांच्या कुटुंबियाना भेटू न देण्याची तरतूद आहे. या अशा निर्णयामुळे अमेरिकेच्या उद्योगांवर परिणाम होऊ शकतो. जगभरातील अनेक देशांतील कर्मचारी या अमेरिकन उद्योगविश्वाचा भाग आहेत. बायडन यांनी सत्तेवर आल्या आल्या परदेशी प्रवाशांना दिलासा देणाऱ्या एका कार्यकारी आदेशावर देखील स्वाक्षरी केली होती. या आदेशान्वये 1.1 कोटी अशा प्रवाशांना फायदा होणार आहे ज्यांच्याकडे कसलेही कायदेशीर दस्ताऐवज नाहीयेत. यामध्ये जवळपास 5 लाख लोक भारतीय आहेत.

हेही वाचा - पॉपस्टार लेडी गागाच्या दोन कुत्र्यांची चोरी; माहिती देणाऱ्याला कोट्यवधींचं बक्षीस

जो बायडन यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वांत आधी इमिग्रेशन सिस्टमला पूर्णपणे बदलण्यास सुरवात केली होती. त्यांनी आपल्या आदेशांद्वारे अशा अनेक दस्ताऐवजांवर हस्ताक्षर केले जे ट्रम्प यांच्या वादग्रस्त इमिग्रेशन सिस्टमला बदलणारे आहेत. जो बायडन यांनी अमेरिकन काँग्रेसला विनंती केली आहे की, त्यांनी 1.1 कोटी अवैध प्रवाशांना स्थायी स्वरुपाचा दर्जा आणि त्यांना नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा बनवावा. एका अंदाजानुसार, यामध्ये जवळपास 5 लाख लोक भारतीय वंशाचे आहेत ज्यांच्या जवळ कायदेशीर दस्ताऐवज नाहीयेत. जो बायडन प्रशासनाचे हे इमिग्रेशन सिस्टम विधेयक ट्रम्प प्रशासनाच्या कडक धोरणांच्या विरोधात आहे.