लडाख सीमेवर चीनचे ६० हजार सैनिक; ड्रॅगनविरोधात एकत्र येण्याचे अमेरिकेचे आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 10 October 2020

गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे

वॉशिंग्टन- गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. मे महिन्यामध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यांनतर १५ जून रोजी झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याने दोन्ही देशांनी सीमा भागात मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनच्या दांडगाईचा निषेध केला आहे. चीन क्वॉड Quad देशांसाठी धोका ठरत असल्याचं परराष्ट्रमंत्री  माईक पॉम्पिओ म्हणाले आहेत. 

Bihar Election : गळ्यात गळे आणि हातात हात चालणार नाहीत; बिहार प्रचार रॅलींसाठी...

क्वॉड गटामध्ये भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या हिंद-पॅसिफिक महासागरातील मोठ्या देशांचा समावेश होतो. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच या चार देशांची बैठक जपानच्या टोकिओमध्ये पार पडली. यावेळी चारी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एकमेकांशी चर्चा केली. चीनचे महत्व कमी करण्याबाबतही देशांमध्ये बोलणी झाली. बैठकीनंतर एका मुलाखतीत बोलताना पॉम्पिओ यांनी चीनवर टीका केली आहे. चीनने भारताच्या उत्तर सीमेवर ६० हजार सैनिक तैनात केले आहे. यावरुन चीन कसा धोकादायक आहे हे स्पष्ट होतं, असं ते म्हणाले आहेत. 

चीनने हिंदी आणि पॅसिफिक महासागरात तसेच दक्षिण चीन समुद्र, लडाख भागात आक्रमक भूमिका घेतली आहे. या भागात चीनकडून लष्करी तैनाती वाढवण्यात आली आहे. यावर बोलताना पॉम्पिओ म्हणाले की, चीनपासून धोका वाढत आहे. जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांनाही चीनच्या मुजोरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे क्वॉड देश मिळून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीकडून निर्माण होत असलेल्या आक्रमकपणाला लगाम लावला पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

मायक्रोसॉफ्टकडून कर्मचाऱ्यांना कायमचं 'वर्क फ्रॉम होम'

पॉम्पिओ यांनी टोकिओच्या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली होती. पॉम्पिओ यांनी या बैठकीचा उल्लेख 'फायदेशीर' असा केला आहे. गेल्या अनेक दशकांपासून पश्चिमेने चीनला मुक्त वावर दिला आहे. मागील सरकारने त्यांच्यासमोर शरणागती घेतली होती. त्यामुळे आपल्या अनेक नोकऱ्या त्यांनी हिसकावल्या आहेत.  चीनविरोधात अनेक देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्याचमुळे चार सर्वात मोठी लोकशाही असलेले देश, सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र येत आहेत,असं पॉम्पिओ म्हणाले. 

भारतीयांचा सध्या चीनच्या लष्करासोबत हिमालयामध्ये संघर्ष सुरु आहे. चीन भारताविरोधात मोठ्या प्रमाणात लष्करी बळाचा वापर करत आहे. ऑस्ट्रेलियासोबतही चीन वाद घालत आहे. मात्र, जग आता जागा होत आहे, त्यांना चीनकडून असणारा धोका लक्षात आला असल्याते पॉम्पिओ म्हणाले आहेत. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China deployed 60K soldiers on India northern border said us secretary mike Pompeo