अमेरिकेने WHO चा निधी रोखल्यानंतर चीनची मोठी घोषणा; अतिरिक्त मदतनिधी केला जाहीर!

वृत्तसंस्था
Thursday, 23 April 2020

टेड्रोस यांचा राजीनामा येईपर्यंत एजन्सीला निधी दिला जाऊ नये, अशी सूचना गेल्या आठवड्यात रिपब्लिकन खासदारांच्या एका गटाने ट्रम्प यांच्याकडे केली होती.

बीजिंग : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि जागतिक आरोग्य संघटनेत आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) देणगी स्वरुपात दिल्या जाणाऱ्या निधीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर चीनने आरोग्य संघटनेला दिली जाणारी मदत वाढविण्याची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरस या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी डब्ल्यूएचओला अतिरिक्त ३ कोटी डॉलर्स निधी देण्याचे चीनने जाहीर केले. यापूर्वी चीनने डब्ल्यूएचओला २ कोटी डॉलर्स दिले होते.

Coronavirus : बिल गेट्स यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले की, चीनने डब्ल्यूएचओला अतिरिक्त ३ कोटी डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी दिलेल्या २ कोटी डॉलर्सपेक्षा ही रक्कम वेगळी असेल. कोरोना विषाणूविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात मदत करणे आणि विकसनशील देशांच्या आरोग्य यंत्रणेस बळकट करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

शुआंग पुढे म्हणाले की, 'चीनने मदत स्वरुपात दिलेले हे योगदान संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीवरील चीनी सरकार आणि आपल्या लोकांप्रति असलेला विश्वास दर्शविते. तत्पूर्वी, डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस यांनी बुधवारी (ता.२२) काही अमेरिकन खासदारांनी राजीनामा देण्याबाबत केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले. 

Coronavirus : कोणतीही चूक करु नका; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा 

ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओला दिला जाणारा निधी रोखला

'लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काम करत राहण्याची मागणी टेड्रोस यांनी अमेरिकेकडे केली. ते पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरसपासून अमेरिकेला सुरक्षित ठेवणे हे महत्त्वपूर्ण आहे, पण इतर देशांनाही मदत करणे, तितकेच महत्त्वाचे आहे.' दरम्यान, ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यातच संयुक्त राष्ट्र संघटनेची भेट घेतली आणि अमेरिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व निधींवर काही काळासाठी स्थगिती देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

- Coronavirus : कोरोनानंतर नवं संकट; त्सुनामीचा इशारा

कोरोना व्हायरस या महामारीला रोखण्यासाठी आणि इतर देशांमधील गैरप्रकारांना आवरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने योग्य पावले उचलली नाहीत, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. अमेरिकेतर्फे डब्ल्यूएचओला दरवर्षी लाखो डॉलर्सची मदत केली जाते.

मात्र, टेड्रोस यांचा राजीनामा येईपर्यंत एजन्सीला निधी दिला जाऊ नये, अशी सूचना गेल्या आठवड्यात रिपब्लिकन खासदारांच्या एका गटाने ट्रम्प यांच्याकडे केली होती. यावर टेड्रोस यांनी म्हटले होते की, 'मी रात्रंदिवस काम करत राहीन, कारण लोकांचा जीव वाचवणे हे सेवाकार्य असून त्याची जबाबदारी माझ्यावर आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China to give WHO 30 million dollars more after US freezes funds for coronavirus fight