टेक्सासमध्ये तुफान बर्फवृष्टी; 21 जणांचा मृत्यू, लाखो घरांमधील बत्ती गुल

सकाळ ऑनलाइन टीम
Wednesday, 17 February 2021

या परिसरात लाखो लोक अडकून बसले आहेत. संपूर्ण टेक्सासमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. परिसरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेतील काही भागात सध्या मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. यामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर पडल्याचे दिसत आहे. अनेक भागात वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे या परिसरात लाखो लोक अडकून बसले आहेत. संपूर्ण टेक्सासमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. परिसरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी टेक्सासमध्ये तातडीची आणबाणी जाहीर केली होती. व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनानुसार या परिसरात मदत अभियान सुरु केले आहे.

टेक्साससह काही भागात विजेचा पुरवठा बंद केल्यामुळे रात्र अंधारात घालवाली लागली आहे. अमेरिकेतील दक्षिण मैदानी भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विमान उड्डाणे रद्द करण्यात आले आहेत. वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. वातावरणातील या बदलामुळे सोमवारी पारा मोठ्याप्रमाणात खाली घसरला. अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा बंद करण्यात आला. टेक्सासमधील इलेक्ट्रिक रिलायबिलिटी कौन्सिलने (इरकॉट) सोमवारी टप्प्या टप्प्याने वीज बंद करण्यास सुरुवात केली. हजारो घरांमध्ये थोड्या थोड्या काळासाठी वीज बंद करण्यात आली होती. डलास आणि ह्यूस्टन येथील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून आले. 

हेही वाचा- तब्बल एका वर्षानंतर दिसून आली किम जोंग उनची बायको; गर्भवती असल्याच्या चर्चा

पॉवर आऊटेज डॉट यूएस वेबसाइटनुसार, टेक्सासमध्ये 40,88,064 ग्राहकांच्या घरातील वीज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेली. टेक्सासमधील नागरिकांनी विजेचा वापर कमी करावा, असे आवाहन कौन्सिलने टि्वट करुन केले. या कौन्सिलकडून राज्यात विजेचे वितरण केले जाते. वाहतुकीसाठी वीज आणि इतर प्रमुख सुविधांसाठी तात्पुरत्या रुपात वीज पुरवठा बंद केला जाऊ शकतो, असेही कौन्सिलने आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते. 

विजेच्या समस्येचा सामना करत असलेल्या परिसरात मदत लवकर पोहोचावी यासाठी गव्हर्नर ग्रेग एबॉट हे प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार बहुतांश कंपन्या कोळसा, नॅचरल गॅस आणि पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्माण करण्यास असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे वीज पुरवठा बंद होण्याची समस्या समोर आली आहे. 

हेही वाचा- अभिमानास्पद : 200 भारतीय 15 देशांमध्ये उच्चपदस्थ; 60 जण विविध देशांच्या सरकारांमध्ये

ग्रेग एबॉट म्हणाले की, इरकॉट आणि पीयूसी कंपन्या विद्युत पुरवठा सुरळित व्हावा यासाठी मेहनत घेत आहेत. टेक्सासमधील लोकांची मदत केली जात आहे. लोकांनी वीज वाचवावी त्याचबरोबर रस्त्यांपासून दूर राहा, असे आवाहन त्यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold Wave hits USA Texas 21 dies millions without power