धक्कादायक! जगात कोरोनामुळे तासाला 247 जणांचा होतोय मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

जगातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी 7 लाखांच्या वर पोहोचली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिकोमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

वॉशिंग्टन - जगातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी 7 लाखांच्या वर पोहोचली आहे. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिकोमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अमेरिका आणि लॅटीन अमेरिका कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. दोन्ही देशांमध्ये कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी संघर्ष सुरू आहे. लॅटीन अमेरिकेत सुरुवातील कोरोनाचा वेग कमी होता पण आता रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. 

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्युच्या आकडेवारीचं विश्लेषण रॉयटर्स वृत्तसंस्थेनं केलं आहे. गेल्या दोन आठवड्यांच्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी विश्लेषण केलं आहे. त्यातून धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. जगात दर 15 सेंकदाला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. एका दिवसात म्हणजेच 24 तासात 5 हजार 900 लोकांचा मृत्यू होत असून यानुसार तासाला सरासरी 247 लोकांना प्राण गमवावा लागत आहे. 

हे वाचा - बिल गेट्स यांनी सांगितलं, कधी मिळणार लस आणि संपणार कोरोना?

लॅटीन अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्रातील 10 कोटी लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहणारी आहे. यामुळेच या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. अमेरिकेतील व्हायरस तज्ज्ञ अँथनी फौची यांनी सोमवारी सांगितलं होतं की, ज्या अमेरिकन राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणं समोर आली आहेत त्याठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्यावर विचार करायला हवा. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे.  सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला सुरुवातील अपयश आलं त्यामुळे दीड लाखांहून अधिक नागरिकांना प्राण गमवावा लागला. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही काही केलं नाही. जितकं नियंत्रण मिळवता येईल तेवढं मिळवलं असंही ट्रम्प यांनी Axios news वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

हे वाचा - BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

ऑस्ट्रेलिया, जपान, हाँग काँग, बोलव्हिया, सुदान, इथियोपिया, बल्गेरिया, बेल्जियम, इस्रायल या देशांमध्ये गेल्या काही काळात कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचं दिसतं आहे. मात्र या देशांमध्येही परिस्थिती बदलत आहे. जगात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 कोटी 87 लाख 10 हजार 432 इतकी झाली आहे. नोंद असलेली ही आकडेवारी असून जगात असे अनेक रुग्ण असू शकतात ज्यांची कोरोना चाचणी झालेली नाही. त्यांना कोरोना झालेला असू शकतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update worldwide 1 death in 15 second