कोरोना व्हायरस : जाणून घ्या, देश आणि जगभरातील अपडेट्स

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

गेल्या दीड महिन्यात जवळपास 3 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवड्याभरात रुग्णसंख्येच्या वाढीमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकलं आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतासह जगभरात वाढत चालला आहे. जगातील कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटींहून जास्त झाली आहे. भारतात गेल्या चोवीस तासात 55 हजार रुग्णांची भर पडली आहे. जगात कोरोनमुळे मृतांची संख्या 7 लाख 36 हजार इतकी झाली आहे. गेल्या दीड महिन्यात जवळपास 3 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवड्याभरात रुग्णसंख्येच्या वाढीमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकलं आहे. भारतात गेल्या आठवड्याभरात सरासरी ५८,७६८ रुग्ण दिवसाला सापडले तर अमेरिकेत हेच प्रमाण ५३,८१३ इतकं आहे. 

भारतात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत बाधितांची संख्या 22.68 लाखवर पोचली. गेल्या चार दिवसांपासून दररोज 60 हजार रुग्ण सापडत असताना आज हा आकडा पाच हजाराने कमी झाला. देशात रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही ६९.८० टक्के असून आतापर्यंत १५ लाख ८३ हजार ४८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्युदरही कमी झाला असून तो दोन टक्क्यापेक्षा कमी १.९९ टक्के आहे. सध्या देशात २२ लाख ६८ हजार ६७५ जणांना बाधा झाली असून त्यात कालच्या ५३ हजार ६०१ जणांचा समावेश आहे.

हे वाचा - पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

देशात कोरोनामुळे 45 हजार मृत्यू
देशात आतापर्यंत ४५,२५७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे ८७१ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात महाराष्ट्रातील २९३, तमिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येकी ११४, आंध्रातील ८०, उत्तर प्रदेशातील ५१, पश्‍चिम बंगालमधील ४१, दिल्ली आणि गुजरातमधील प्रत्येकी २०, मध्य प्रदेशातील १९, पंजाबमधील १८, ओडिशातील १४ आणि झारखंड व राजस्थानातील प्रत्येकी ११ जणांचा मृतांत समावेश आहे. 

जगात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन कोटींच्या पुढे 
जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. बाधितांची संख्या वाढण्याचा वेग मोठा असून गेल्या ४५ दिवसांमध्येच ही संख्या दुप्पट झाली असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने सांगितले आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्यक्ष रुग्णसंख्या यापेक्षाही अधिक आहे. बाधितांपैकी ४० टक्के जणांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे नाहीत. म्हणूनच, संसर्ग पसरण्याचा धोकाही मोठा असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्याही आता ७ लाख ३६ हजारांवर गेली आहे. ४५ दिवसांपूर्वी हीच संख्या चार लाख ९९ हजारांच्यावर होती. 

Beirut Blasts: नागरिकांच्या रोषासमोर अखेर सरकार झुकले

संसर्गाचा प्रभाव 
६ महिने : रुग्णसंख्या १ कोटीपर्यंत जाण्यास लागलेला कालावधी 
४५ दिवस : रुग्णसंख्या १ कोटीवरून २ कोटी होण्यासाठीचा कालावधी 
३ देश (अमेरिका, ब्राझील आणि भारत) : निम्म्याहून अधिक रुग्ण या देशांत 
५८,७६८ : भारतातील रुग्णवाढीची गेल्या आठवड्यातील सरासरी 
५३,८१३ : अमेरिकेतील रुग्णवाढीची गेल्या आठवड्यातील सरासरी 
५२००/प्रतिदिन : गेल्या ४५ दिवसांतील मृत्युचे प्रमाण 
१/५ मृत्यू : केवळ अमेरिकेत 

हे वाचा - भारत बायोटेकची चाचणी दुसऱ्या टप्पात; कंपनीवर लसीसाठी प्रचंड दबाव

नेत्यांचा निष्काळजीपणा 
अमेरिका, ब्राझील आणि मेक्सिकोमध्ये रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण बरेच असतानाही या देशांचे प्रमुख आरोग्याबाबतचे नियम पाळण्यात टाळाटाळ करत आहेत. अँडर्स मॅन्युएल ओब्रॅडोर (मेक्सिको), जेर बोल्सोनारो (ब्राझील) आणि डोनाल्ड ट्रम्प (अमेरिका) हे राष्ट्रप्रमुख क्वचितच मास्क घालतात. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंधही कमी करण्यात येत आहेत. परिणामी रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसते. मेक्सिको, जपान, इंडोनेशियासह आफ्रिकन खंडातील देशांमध्ये कोरोनाचा ससंर्ग वाढत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus updates india and worldwide