Coronavirus : 17 हजार नागरिक कोरोनाच्या विळख्यात? चीनमधील बळी संख्या 259वर!

वृत्तसंस्था
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

विषाणूची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या एक लाख 36 हजार 987 जणांवर वैद्यकीय पाळत ठेवली जात आहे.

बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे बळी पडलेल्यांची संख्या 259 वर पोचली असून, आणखी 11 हजार 791 जणांना याची लागण झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी कोरोना विषाणूंची लागण झालेल्या 1 हजार 795 रुग्णांची नोंद झाली असून, या विषाणूची लागण झालेल्या संशयितांचा आकडा 17 हजार 988 वर पोचल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले. तर, एकूण 243 रुग्णांवर उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी या वेळी नमूद केले.

- ब्रेक्‍झिटचे स्वप्न साकार; भारतावर असे होणार सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम

गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढतच असून, शुक्रवारी या विषाणूची लागन झाल्याच्या 2 हजार 102 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर, 5 हजार 19 संशयित रुग्ण या दिवशी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चीनव्यतिरिक्‍त इतर देशांमध्ये या विषाणूंची लागण झालेले 124 रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. तर, चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार येथील हुबेई प्रांतातूनच या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली असून, वुहान येथे सर्वप्रथम या रोगाचे रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे.

- अबब! जेफ बेझोस यांच्या संपत्तीत 15 मिनिटांत 13 अब्ज डॉलरची भर

वुहानमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे 45 जणांचा मृत्यू झाला असून, 1 हजार 347 जणांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, विषाणूची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या एक लाख 36 हजार 987 जणांवर वैद्यकीय पाळत ठेवली जात आहे. यातील 6 हजार 509 जणांना उपचारानंतर शुक्रवारी घरी सोडण्यात आले असून, 1 लाख 18 हजार 478 जण वैद्यकीय निरीक्षणाखाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

- Coronavirus : कोरोनाचा उद्रेक; चीनमधून परतले 324 भारतीय

अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य आपत्ती जाहीर 

अमेरिकेने शुक्रवारी देशात सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली असून, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून चीनमध्ये गेलेल्या परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी घातली आहे. दरम्यान, गेल्या चौदा दिवसांत चीनचा दौरा केलेल्या अमेरिकन नागरिकांवरही हे निर्बंध लागू असतील, अशी माहिती आरोग्य सचिव अलेक्‍स अझर यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus death toll passes to 259 in China