Corona-Virus
Corona-Virus

Coronavirus : कोरोनाचा उद्रेक; चीनमधून परतले 324 भारतीय

नवी दिल्ली : चीनमधील वुहानमधून शनिवारी (ता.1) 324 भारतीय दिल्लीत दाखल झाले. आज सकाळी साडेसातच्या सुमारास एअर इंडियाचे विशेष विमान त्यांना घेऊन दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

विमानातील सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून 104 जणांना आयटीबीपीच्या विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 220 जणांना मानेसरयेथील लष्कराने तयार केलेल्या विशेष रुग्णालयात तपासणी करता दाखल करण्यात आले आहे. उर्वरित भारतीयांना परत आणण्यासाठी आणखी एक विमान चीनकडे रवाना झाल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चीनमधील वुहानमध्ये कोरोना विषाणूंचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये घबराट पसरली असताना तिथे अडकून पडलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी 'एअर इंडिया'ने पुढाकार घेतला. त्यासाठी 'डबल डेकर' श्रेणीतील मोठे विमान 31 जानेवारीला सकाळीच मुंबईहून दिल्लीला रवाना करण्यात आले.

दिल्लीहून हे विमान दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी वुहानला रवाना झाले. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हे विमान वुहानमध्ये पोचले होते. ते आज सकाळी 7.30 वाजता भारतात परतले. यात 211 विद्यार्थी, 110 जण नोकरदार, व्यावसायिक आणि तीन अल्पवयीन असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्‍त्यांनी दिली.

तसेच विमानाच्या केबिन क्रू आणि प्रवाशांमध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद झाला नाही. प्रवाशांसाठी आवश्‍यक असलेले सामान त्यांच्या आसनासमोरील कप्प्यात ठेवण्यात आले होते, अशी माहिती एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्‍वनी लोहानी यांनी दिली.

दरम्यान, 324 जणांपैकी 104 जणांना दिल्लीमधील भारत-तिबेट सीमा सुरक्षा पोलिसांनी (आयटीबीपी) उभारलेल्या विशेष रुग्णालयात तपासणी करता दाखल करण्यात आले आहे. 104 जणांमध्ये 88 महिला, 10 पुरुष आणि 6 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक कुमार पांडे यांनी सांगितले. या वेळी या रुग्णांवर उपचार करण्यासाठी 25 डॉक्‍टरांचा चमू तैनात करण्यात आला असून, यातील 15 डॉक्‍टर हे सफदरगंज रुग्णालयातील आहेत, तर 10 जण आयटीबीपीच्या रुग्णालयांमधील आहेत. 

दोन प्रवाशांना परतण्यापासून रोखले 

दोन भारतीयांना मायदेशी परतण्याची परवानगी चिनी अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. भारतात परतण्याआधी सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्या वेळी दोन भारतीयांमध्ये कोरोनाच्या लक्षणांपैकी एक लक्षण आढळल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना विमानात जाण्यापासून रोखले. यात एक महिला आणि एक पुरुष प्रवासी आहे.

या दोघांनाही ताप असल्याचे समोर आले आहे. रोखण्यात आलेल्या एका प्रवाशाचा ताप हा मर्यादेपलीकडे होता, तर दुसऱ्या प्रवाशाला ताप येत जात होता. ताप येणे हे कोरोनाच्या लक्षणांपैकी एक महत्त्वपूर्ण लक्षण आहे. त्यामुळे विशेष विमानाने भारतात परतण्यासाठी त्यांना चिनी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com