Coronavirus:चीननंतर 'या' देशात आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

टीम ई-सकाळ
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या विषाणूचा प्रसार चीनबाहेरही झाला असून, या विषाणूमुळे इराणमध्ये आतापर्यंत ३४ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे.

सेऊल : कोरोना विषाणूमुळे चीननंतर आता दक्षिण कोरियामधील आरोग्य यंत्रणा हतबल झाली असून, कोरियात दोन हजार ९३१ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दक्षिण कोरियामध्ये शुक्रवारी एकाच दिवसात ५९४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिली असून, यामुळे देशातील संशयित रुग्णांचा आकडा तीन हजारांच्या आसपास पोचला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोरियात आत्तापर्यंत कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला असून, २७ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली आहे. तसेच देशातील वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने देशात रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूचा प्रसार चीन, दक्षिण कोरिया आणि इराणव्यतिरिक्त अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन आणि भारत यासह अन्य 45 देशांमध्ये झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने हा उद्रेक आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केला आहे. तसेच सध्या होणाऱ्या कोरोनाच्या प्रसाराची पातळी ही धोकादायक मानली जात असून, सर्व देशांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

आणखी वाचा - कोरोना व्हायरसचा कोरोना बिअरवर काय झाला परिणाम?

चीनमध्ये कोरोनामुळे दोन हजार ८३० जणांचा मृत्यू 
चीनमधील कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा दोन हजार ८३५ झाला असून ७९ हजार २५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी नमूद केले आहे. लागण झालेल्या रुग्णांपैकी ७ हजार ६६४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आत्तापर्यंत ३९ हजार जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून, त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

आणखी वाचा - बाप रे सोन्याचा दर, लाखावर!

इराणमध्ये कोरोनामुळे ३४ जणांचा मृत्यू 
चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या विषाणूचा प्रसार चीनबाहेरही झाला असून, या विषाणूमुळे इराणमध्ये आतापर्यंत ३४ जणांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनमधील तज्ज्ञांचा एक गट इराणमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती चीनच्या प्रशासनाने आज दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनबाहेर सर्वाधिक मृत्यू हे इराणमध्ये झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इराणमध्ये होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने आपले एक तज्ज्ञ मंडळ पाठवले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus infected country number goes 3 thousand south korea