coronavirus relief no new cases china update worldwide
coronavirus relief no new cases china update worldwide

हुश्श : चीनमध्ये नवा संसर्ग नाही; पण एक चिंता कामय, जाणून घ्या जगात कोठे काय घडले?

बीजिंग Coronavirus : चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने अक्षरशः धुमाकूळ घालताना हजारो लोकांचे बळी घेतले होते. त्याच वुहानमध्ये आज प्रथमच एकही नवा संसर्ग झाला नसल्याचे उघड झाले आहे. येथील संसर्ग थांबला असला तरी सुद्धा मरण पावणाऱ्यांची संख्या मात्र वाढत चालली आहे. ही बाब चिंताजनक आहे. आज पुन्हा आठ जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे येथील मृतांची संख्या ३ हजार २४५ वर पोचली आहे.

सध्या कोरोनाच्या विषाणूने अमेरिकेप्रमाणेच युरोप खंडामध्येही धुमाकूळ घातला असून, चीनमध्ये वैद्यकीय संशोधक आणि चिकित्सकांनी या विषाणूविरोधातील लढाई जिंकल्याने जगभरातील संशोधकांच्या आशा वाढल्या आहेत. सध्या चीनमध्ये केवळ ३४ जणांनाच ही विषाणू बाधा झाली असून ते सर्वच जण परदेशातून आलेले आहेत, असे चीनच्या आरोग्य आयोगाकडून सांगण्यात आले. 

ते औषध ठरले गुणकारी 
तब्बल २५ वर्षांपासून तयार करण्यात आलेले फॅव्हिपिरावीर हे औषध कोरोना बाधितांसाठी गुणकारी ठरत असल्याची माहिती चीनमधील नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट या संस्थेने दिली आहे. त्यामुळे लवकरच जगाच्या अन्य भागांमध्येही याच औषधाचा उपचारासाठी वापर केला जाऊ शकतो. 

पाकमधील विषाणू संसर्ग वाढला 
पाकिस्तानमधील कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग वाढत चालला असून आज येथील संसर्ग झालेल्यांची संख्या ३०१ वर पोचली आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे येथे दोघांना प्राण गमवावे लागले आहेत. मर्दान शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे खैबर पख्तुनवा प्रांताचे आरोग्यमंत्री तैमूर खान जाझरा यांनी सांगितले. पाकमधील सिंध प्रांताला या विषाणूच्या संसर्गाचा मोठा फटका बसला असून तेथे २०८ जणांना याचा संसर्ग झाला आहे. यानंतर पंजाब प्रांताचा क्रमांक लागतो, येथेही ३३ जणांना या विषाणूची बाधा झाली आहे. 

ट्रम्प थेट मदत करणार 
विषाणू संसर्गाचा सामना करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांना थेट वित्तीय सहाय्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कोरोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका बसणार असून, नागरिकांना थेट आर्थिक मदत केली जावी, अशी मागणी त्यांनी काँग्रेसकडे केली व अमेरिकेकडून लवकरच मदतीसाठी पाचशे अब्ज डॉलरची मदत जाहीर केली जाऊ शकते. 

इटलीमध्ये ४७५ जणांचा मृत्यू 
इटलीमध्ये आज दिवसभरात विषाणूच्या संसर्गामुळे ४७५ लोकांचा मृत्यू झाला असून, येथील एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २ हजार ९७८ वर पोचली आहे. आतापर्यंत येथील एकूण बाधितांची संख्या ३५ हजार ७१३ वर पोचली आहे. जगात चीननंतर इटलीमध्ये या विषाणूचा सर्वाधिक संसर्ग झाला असून, येथील मृतांची संख्याही वेगाने वाढते आहे 

जगभरात काय घडले?

  • सिंगापूरमध्ये ९७ भारतीय अडकले 
  • अमेरिकेने व्हिसा सेवा बंद केली 
  • जर्मनीत बाधितांची संख्या दहा हजारांवर 
  • इराणमध्ये एकाच दिवसात १४९ लोकांचा बळी 
  • पाककडून वाघा सीमा बंद करण्याचा निर्णय 
  • उत्तर आयर्लंडमध्ये कोरोनाचा पहिला बळी 
  • लंडनमध्ये शाळा, महाविद्यालयं बंद
  • अफ्रिकेत संसर्ग कमी, संसर्गाची २३३ प्रकरणे उघड, चौघांचा मृत्यू 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com