कोरोनाचा कहर : चीनच्या वुहानमध्ये मृत्यूचे तांडवर सुरूच; इटलीची स्थितीची चिंताजनक 

टीम ई-सकाळ
बुधवार, 11 मार्च 2020

जगभरातील मृतांचा आकडा हा चार हजारांपेक्षा अधिक आहे. याशिवाय चीनमध्ये नव्याने २४ संशयित रुग्ण आढळून आल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.

बीजिंग Coronavirus China : चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी कोरोनाग्रस्त वुहानच्या दौऱ्यादरम्यान आजारावर मात केल्याचा दावा केलेला असताना गेल्या चोवीस तासांत २२ बळी गेले आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ३,१५८ वर पोचली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जगभरातील मृतांचा आकडा हा चार हजारांपेक्षा अधिक आहे. याशिवाय चीनमध्ये नव्याने २४ संशयित रुग्ण आढळून आल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. मृत २२ जण वुहान शहरातीलच आहेत. दरम्यान, चीननंतर आता इटलीत सर्वांत गंभीर स्थिती दिसत आहे. चीनमधील आजवरचे बळी 4 हजार झाले असले तरी, आता चीनच्या बाहेरील बळींची संख्याही 1 हजारच्या वर पोहोचली आहे.

 आणखी वाचा - बॅडमिंटन स्पर्धा होणार पण...

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी ८०,७७८ वर पोचली आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांत मृत्युमुखी पडलेल्या ३,१५८ रुग्णांचा समावेश आहे. चीनमध्ये विविध रुग्णालयांत १६,१४५ रुग्णांवर उपचार सुरू असून ६१,४७५ जणांना घरी सोडल्याचे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. त्याचवेळी दिवसभरात ३१ नवीन संशयित आढळून आले आहेत. 

आणखी वाचा - विदेशी पर्यटकांच्या व्हिसाबाबत भारताचा मोठा निर्णय

कामावर येण्यास मुभा 
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे वुहानमधील बंद ठेवलेल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आता कामावर येण्याची मुभा दिली गेली आहे. त्यामुळे येत्या २० मार्चपर्यंत कंपन्यांकडून उत्पादन सुरू होईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. कमी जोखीम असलेल्या भागातील कंपन्या, संस्था सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. वुहान वगळता मध्यम आणि कमी जोखमीच्या ठिकाणी प्रवासी विमाने, रेल्वेसेवा, मोटार, जहाज आणि शहर वाहतूक सुरू करण्याबाबत सरकारने सांगितले आहे. हुबेई प्रांत वुहान येथे व्हायरस रोखण्यासाठी आणखी कठोर उपायांची अंमलबजावणी केली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

आणखी वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचे दहा रुग्ण, पुण्यातीलच तिघे वाढले

अमेरिकेतील मृतांची संख्या ३१ वर 
अमेरिकेतील कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आज ३१ वर पोचली आहे. आतापर्यंत एक हजार रुग्ण आढळून आले असून ३० पेक्षा अधिक राज्यात कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत १ हजार ३७ जणांना कोव्हिड-१९ ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याचे जॉफ हॉपकिन्स कोरोनाव्हायरस रिसोर्स सेंटरने म्हटले आहे. गेल्या चोवीस तासात साउथ दाकोटा, कॅलिफोर्निया येथील प्रत्येकी एक आणि वॉशिंग्टन येथील दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

इटलीत मृतांची संख्या 168 वर 
युरोपच्या करोनाबाधित इटलीतील मृतांची संख्या 168 वर पोचली आहे. इटलीतील लोंबार्डी भागात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथे बाधितांची संख्या तिपटीने वाढली आहे. आतापर्यंत दहा हजार जणांना बाधा झाली आहे. जगात शंभराहून अधिक देशात कोरोना संसर्गाचा प्रसार झाला असून, जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री नदीन डॉरिस यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus wuhan china update italy more deaths