जगाच्या पाठीवर : चीनची 'सोची समझी चाल'

dhananjay bijale writes about China and world affairs
dhananjay bijale writes about China and world affairs

सारं जग कोरोनाशी मुकाबला करताना मेटाकुटीला आले असताना चीनने मात्र शेजारी देशांच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे. भारत, मलेशिया, तैवान, फिलीपाईन्स, व्हिएतनाम आदींची कुरापत काढतानाच हॉंगकॉंगच्या बाबतीत कडी केली आहे. हॉंगकॉंगवरील पकड घट्ट करण्यासाठी वादग्रस्त सुरक्षा विधेयक संसदेत मंजूर करून हॉंगकॉंगला आश्वस्त केलेलेल्या स्वायत्ततेला नख लावले आहे. त्यामुळे हॉंगकॉंगमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाचा वणवा भडकला आहे.

जगातील सर्वसामान्य जनता कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात थांबण्याचा प्रयत्न करीत आहे. पण हॉंगकॉंगच्या जनतेला लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरणे भाग पडले आहे. लोक जीव धोक्यात घालून मास्क लावून निदर्शने करीत आहेत. एकीकडे कोरोनाच्या प्रसाराची भिती तर दुसरीकडे स्वायत्तता गमावण्याची भिती अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या हॉंगकॉंगवासियांनी अखेर स्वायत्ततेला प्राधान्य दिले असून सर्वशक्तीनिशी ते चीनला विरोध करीत आहेत. हॉंगकॉंगमधील या आंदोलनाने जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधून घेतले आहे.

चीनची सोची समझी चाल...
न्यूयॉर्क टाईम्सच्या मते चीन अगदी ठरवूनच असे वागत आहे. जगाचे लक्ष कोरोनाकडे असताना गेल्या पंधरवड्यात चीनने मलेशिया व व्हिएतनाममध्ये नौका घुसविल्या, तैवानच्या अध्यक्षांना जाहीर धमकी दिली, भारतीय हद्दीत सैनिक घुसविले. हॉंगकॉंगमध्ये सर्वाधिक बेजबाबदार कृत्य करीत आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांची फिकीर करीत नसल्याचे चीनने दाखवून दिले. सात वर्षे सत्तेवर असलेल्या अध्यक्ष शी जिनपिंग यांना कोरोनाचा मुकाबला करण्यात आधी अपयश आले. त्यांच्यापुढे आता अनेक आर्थिक आव्हाने आहेत. पण या निदर्शनांमुळे लोकांचे लक्ष अन्यत्र वळेल.

हॉंगकॉंगची निदर्शने महत्वाची
वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे की, नव्या संभाव्य कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र अशी ख्याती असलेल्या हॉंगकॉंगच्या रुतब्याला तडा जाणार आहे. शहराच्या राजकीय व आर्थिक भविष्यावर आता ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या तरी चीन आपल्या निर्णयापासून माघार घेण्याची शक्यता फार कमी आहे. ट्रंप प्रशासनाशी उत्तम संबंध राखण्याची आशा चीनने जवळपास सोडली आहे. त्यामुळेच की काय कोणताही निर्णय घेताना अमेरिकेच्या मताची आम्ही काळजी करीत नसल्याचे चीनला साऱ्या जगाला विशेषतः तैवानला दाखवून द्यायचे आहे. त्यामुळेच हॉंगकॉंगची निदर्शने फार महत्वाची आहेत. लोकशाही व मानवाधिकारासाठी हॉंगकॉंगवासिंयानी व जगाने हा लढा जिंकलाच पाहिजे.

आणखी वाचा - एकदा दोनदा नव्हे, तिसऱ्यांदा त्यानं केला विवाह

चीनची नसती उठाठेव
देशावर मोठे संकट आले की राज्यकर्ते जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी जे करतात तेच चीनचे राज्यकर्ते सध्या करीत असल्याचे द अटलांटिकने म्हटले आहे. फिलीपाईन्स, मलेशिया, हॉंगकॉंग मधील गेल्या पंधरा दिवसाची चीनची वर्तणूक आपल्या देशातील जनतेचे कोरोनावरील लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी केलेल कृत्य आहे. त्याचप्रमाणे तणावाने भारलेल्या या काळात जगात आपले स्थान बळकट करण्यासाठी देखील अशा बाबींचा उपयोग होतो हे चीनला नेमकेपणाने माहिती आहे. त्यासाठीच चीन ही नसती उठाठेव करीत आहे.

हॉंगकॉंगमधील उग्र निदर्शने भविष्यात कोणत्या दिशेने वळण घेतील हे सांगणे जसे अवघड आहे तसेच अमेरिका व अन्य देश चीनच्या कृतीवर कसे व्यक्त होतील हेही सांगणे कठीण आहे. पण ब्रिटनशी झालेला करार मोडून चीन हॉंगकॉंगमध्ये नवा कायदा आणू पहात आहे. जागतिक महासत्ता होण्याची मनीषा बाळगणाऱ्या देशाला अशा प्रकारे लोकशाही मुल्ये पायदळी तुडवणे परवडणारे नाही. अशा कृतीतून कम्युनिस्ट पक्षाची चीनवरील अंतर्गत पकड भक्कम होईल पण जगाचे नेतृत्व करण्याची इच्छा मात्र कधीच फलद्रुप होणार नाही. धुमसत्या हॉंगकॉंगचा हाच खरा सांगावा आहे. तुम्हाला जर जगाचे नेतृत्व करायचे असेल तर त्या प्रमाणे आपली वर्तणूक असावी लागते. सारे जग आज चीनकडे संशयाने पहात आहे.

जगभरातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचा प्रसार चीनमुळे झाला असे पाश्चिमात्य देश उच्चस्वरात सांगत आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी चीनने 80 हून अधिक देशांना थेट मदत दिली आहे. यातून सॉफ्ट पॉवर होण्याचे चीनचे मनसुबे आहेत. पण हे करीत असताना देशातील जनता नाराज होवू नये, यातून सत्तेला आव्हान दिले जावू नये, देशात निदर्शने होवू नयेत यासाठी चीनचे नेतृत्व धडपडत असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच चीनचा ड्रॅगन धसमुसळेपणा करू लागला आहे....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com