पैगंबरांचे व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखवले; फ्रान्समध्ये शिक्षकाचा शिरच्छेद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

पोलिसांनी या घटनेतील संशयित व्यक्तीला जवळच्या गावात गोळ्या घालून ठार केले आहे. 

पॅरिस : फ्रान्समधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इतिहासाच्या शिक्षकाने मोहम्मद पैगंबर यांचे एक व्यंगचित्र आपल्या वर्गात दाखवले म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे समजते आहे. काल शुक्रवारी या शिक्षकाची शिरच्छेद करुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता घडली आहे. यानंतर या घटनेतील आरोपीला पोलिसांनी मारलं आहे. फ्रान्सच्या दहशतवाद विरोधी पथकाने सांगितले की ते या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शिक्षकाने इतिहास विषयाअंतर्गत मोहम्मद पैगंबर यांच्यावर वर्गात चर्चा केली होती. ही घटना दहशतवादी संघटनांशी निगडीत हत्या असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.  

हेही वाचा - US Election : अंतिम डिबेटचा आखाडा सजला; कोरोनासह राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर रंगणार चर्चा

फ्रान्समधील न्यूज रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला पॅरिसच्या वायव्य भागातील उपनगरामध्ये कन्फ्लान्स सेंट होनोरिनच्या शाळेजवळ झाला आहे. पोलिसांनी या घटनेतील संशयित व्यक्तीला जवळच्या गावात गोळ्या घालून ठार केले, अशी माहिती फ्रेंच न्यूज रिपोर्ट्सने दिली आहे. ही हत्या दहशतवादाशी निगडीत हत्या असून दहशतवादी कारवाया अंतर्गत फ्रान्सच्या दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा तातडीने तपास सुरु केला आहे. 

हेही वाचा - गैरप्रकार रोखण्यात अमेरिकेला सीबीआयची मदत

या गंभीर घटनेची दखल घेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ऍम्यूअल मॅक्रॉन यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी दहशतवादाचा आम्ही बिमोड करु असं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की. आम्ही आरोपींना सोडणार नाही. फ्रान्समध्ये प्रतिगामित्व आणि हिंसा अजिबात जिंकणार नाही. हे आमच्यात फुट पाडू शकत नाही असंही त्यांनी म्हटलं. ही घटना 2015 मध्ये घडलेल्या चार्ली हेब्दो घटनेसारखीच असल्याचे बोललं जातंय. व्यंगचित्राचे साप्ताहिक असणाऱ्या चार्ली  हेब्दोमध्ये छापून आलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या एका व्यंगचित्रा बदला म्हणून हल्ला करण्यात आला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France teacher killed for showing caricature of prophet Mohammad in class